ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - आयपीएल खेळाडूंच्या लिलावात एकाही फ्रॅन्चायझीने आपल्याला घेण्यास रस न दाखवल्याने नाराज झालेल्या भारतीय क्रिकेटर इरफान पठाणने सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्राद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. कोणीही आपल्याला खरेदी न केल्याने इरफान पठाण भावनिक झाला असून त्याने पत्राच्या माध्यमातून आपला संघर्ष मांडला आहे.
इरफान पठाणला आयपीएलमध्ये 50 लाखांची मूळ किंमत ठेवण्यात आली होती. इरफान पठाणला चांगली किंमत मिळेल असा अंदाज बांधण्यात येत होता. मात्र त्याउलट नवख्या खेळाडूंना घेण्यात अनेक फ्रॅन्चायझीने रस दाखवला. मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत इरफान पठाने एक-दोन चांगल्या खेळी केल्या, पण फ्रॅन्चायझी मालकांना आकर्षित करण्यात तो अपयशीच ठरला.
ही गोष्ट इरफानच्या मनाला जास्तच बोचली असून ट्विटरच्या माध्यमातून पत्र शेअर करत त्याने पाच वेळा फ्रॅक्चर होऊनदेखील क्रिकेट खेळण्याचं स्वप्न मागे पडू न देता कसा लढा दिला याबद्दल सांगितलं आहे.
'2010 रोजी माझ्या पाठीला पाच फ्रॅक्चर झाले होते. मी आता कदाचित कधीच खेळू शकत नाही, आणि क्रिकेटला मला अलविदा करावा लागेल असं फिजिओने मला सांगितलं होतं. यावेळी मी कोणत्याही वेदना झेलायला तयार आहे, पण देशासाठी क्रिकेट न खेळता लाबं राहण्याची वेदना सहन नाही करु शकत असं त्यांना सांगितलं होतं', असं इरफानने पत्रात लिहिलं आहे.
'ज्याप्रकारे सर्व अडचणींचा सामना करत भारतीय संघात पुन्हा कमबॅक केलं, त्याप्रमाणे करिअरमधील हा अडथळाही पार करेन', असा विश्वास इरफानने व्यक्त केला आहे.
'मेहनतीच्या आधारे मी पुन्हा फक्त क्रिकेट खेळायला सुरुवात नाही केली, तर संघात स्थानही मिळवलं. करिअरमध्ये अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला असला तरी मी हार मानली नाही. माझं व्यक्तिमत्व असंच असून कायम असंच राहिल. आता माझ्यासमोर हा अडथळा असून यातूनही मी बाहेर पडेन', असं म्हणत इरफानने चाहत्यांचे आभार मानले आहेत.
गेल्या आयपीएल सीजनमध्ये इरफान पठाण रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाकडून खेळला होता. यावेळी मात्र त्याला संघात स्थान मिळालं नाही.
To all my fans