ऑनलाईन लोकमत
मुंबई, दि. 12 - ईशांत शर्माने आयपीएल १० मध्ये आपल्या कामगिरीचा निचांक नोंदवला आहे. त्याने पाच सामन्यात १०२ चेंडू टाकले मात्र त्याला अजूनपर्यंत एकही बळी घेता आलेला नाही. त्याने या स्पर्धेत आतापर्यंत १६७ धावा मात्र दिल्या आहेत. पंजाबने दोन कोटी रुपयांत विकत घेतलेल्या इशांत शर्माने संघासाठी एक बळी घेतलेले नाही.
ईशांतला यास्पर्धेत सुरूवातीला संघात विकत घेण्यास कुणीही उत्सुक नव्हते. फेब्रुवारीत झालेल्या लिलावात त्याच्यावर कोणत्याही फ्रांचायझीने बोली लावली नव्हती. मात्र किंग्ज इलेव्हन पंजाबने अखेरच्या क्षणी त्याच्या बेस प्राईज दोन कोटी रुपयांत त्याला घेतले. त्याने पहिला सामना १३ एप्रिलला केकेआर विरोधात खेळला त्यात त्याने दोन षटकांत १६ धावा दिल्या.
त्यानंतरच्या सामन्यात १७ एप्रिलला सनरायजर्स विरोधात ४ षटकांत फक्त २३ धावा दिल्या. मात्र त्याला बळी मिळाला नाही. २० एप्रिलला मुंबई इंडियन्सने ईशांतच्या चार षटकांत तब्बल ५८ धावा कुटल्या. आयपीएलच्या या सत्रातील ही दुस-या क्रमांकाची कामगिरी ठरली. एका
सामन्यात सर्वात जास्त धावा देण्याची निचांकी कामगिरी कासिगो रबाडा आणि पॅट कमिन्स या दिल्लीच्या शिलेदारांनी केली आहे. दोघांनी आपआपल्या ४ षटकांत तब्बल ५९ धावा मोजल्या. त्यानंतर २८ एप्रिलला सनरायजर्सने ईशांतच्या चार षटकांत ४१ धावा कुटल्या. तर ११ मे रोजी इशांत मुंबई विरोधात खेळला त्याने तीन षटकांत २९ धावा दिल्या. मात्र त्याला एकही बळी मिळालेला नाही.