श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवसाच्या खेळादरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा आणि यजमान संघाचे खेळाडू यादरम्यान वाद झाला. ही घटना भारताच्या दुसऱ्या डावातील ७६व्या आणि अखेरच्या षटकादरम्यान घडली. या षटकात धम्मिका प्रसाद गोलंदाजी करीत होता. प्रसादने ईशांतला बाउन्सरचा मारा केला. ईशांतने डक करीत बाउन्सर सोडून दिले. त्यानंतर ईशांत गोलंदाजाकडे बघून हसला. त्यामुळे प्रसादला राग अनावर झाला आणि त्याने या षटकात तिसरा बाउन्सर टाकला. नियमानुसार एक षटकात तीन बाउन्सर टाकता येत नाहीत. पंचांनी तो नोबॉल ठरविला. षटकात दोन बाउन्सर टाकणाऱ्या प्रसादने त्यानंतर यष्टीच्या रोखाने चेंडू टाकला. त्यावर ईशांतने पॉर्इंटच्या दिशेला एक धाव वसूल केली. ईशांत धाव घेताना प्रसादच्या जवळून गेला, त्या वेळी गोलंदाजाने काही टिप्पणी केली. त्यामुळे ईशांत पुन्हा एकदा गोलंदाजाकडे गेला. प्रसाद व ईशांत यांच्यादरम्यान वाद सुरू असताना दिनेश चांदीमलने भारतीय फलंदाजाला मुद्दाम धक्का दिला आणि काहीतरी पुटपुटत तेथून गेला. त्यामुळे दुसऱ्या टोकावर असलेला भारतीय फलंदाज रविचंद्र आश्विन नाराज झाला. आश्विनने पंच रॉड टकर आणि नायजेल लाँग यांचे लक्ष या घटनेकडे वेधले. त्यानंतर पंचांनी श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूजला आपल्या खेळाडूंना शांत करण्याची सूचना केली. भारत आणि श्रीलंकन खेळाडूंमध्ये मैदानावर झालेला वादावादीचा प्रकार खेळासाठी चांगला नाही. या अशा काही घटना असतात, त्या कोणालाही पाहाव्या वाटत नाहीत. मैदानावर केवळ खेळाचा आनंद घेतला पाहिजे. आंतरराष्ट्रीय खेळाडू हे लहान मुलांचे रोल मॉडेल असतात. लहान मुलेदेखील असे सामने पाहत असतात. अशा घटनांमुळे जर एखाद्या पालकाला मुलाने खेळाकडे वळूच नये, असे वाटू शकते. - सुनील गावसकरभारतीय संघाचे माजी कर्णधार
श्रीलंकन खेळाडूंसोबत ईशांतची वादावादी
By admin | Published: September 01, 2015 12:08 AM