अभिजीत देशमुख, पॅरिसहून... | Shooting Ranking Event, Paris Olympics 2024: भारतीय तिरंदाजांनी ऑलिम्पिकमध्ये कधीही पदके जिंकली नाहीत, परंतु पॅरिसमधील तिरंदाजीच्या गुरुवारी झालेल्या क्रमवारीतील फेरीनंतर भारतीयांना एक आशा निर्माण झाली आहे. भारतीय महिला संघाच्या तिरंदाज अंकिता भकत, दीपिका कुमारी आणि भजन कौर यांनी भारतीय संघाला आज चौथ्या स्थानी विराजमान केले. महिला तिरंदाजांच्या या कामगिरीमुळे भारतीय संघ महिला सांघिक स्पर्धेच्या QF फेरीसाठी थेट पात्र ठरला आणि आता भारतीय महिला तिरंदाजी संघ पदकापासून केवळ दोन फेऱ्या दूर आहे.
अंकिता भकत हिने ६६६ गुणांसह वैयक्तिक स्तरावर ११वे स्थान पटकावले. भजन कौर हिने २२वे स्थान मिळवले. तर स्पर्धेच्या पूर्वाधात ३७व्या स्थानी असलेल्या दिपिका कुमारीने उत्तरार्धात दमदार पुनरागमन करत २३वे स्थान पटकावले. दिपिका आणि इतर तिरंदाज आपल्या खेळात इतक्या गुंग झाल्या होत्या की त्यांना त्यांचे स्थान इतके वर आले आहे याची कल्पनाही नव्हती.
या दमदार कामगिरीनंतर दिपिका कुमारी म्हणाली, "यंदा आमच्यामध्ये विजयाची भूक आहे. आम्ही यंदाच्या वर्षात झालेले सर्व सामने हरलो आहोत, त्यामुळे आता आमच्यामध्ये विजय मिळवण्याची आग लागली आहे. स्पर्धा संपल्यानंतर आम्हाला कल्पना नव्हती की आम्ही कितव्या क्रमांकावर आहोत. आम्हाला वाटले होते की आमचा संघ पाचव्या किंवा सहाव्या स्थानी असेल. पण आमच्या प्रशिक्षकाने सांगितले की आम्ही क्रमवारीत चौथे स्थान मिळवले आहे.
दिपिकासाठी यंदाचे ऑलिम्पिक खास आहे. कारण हे तिचे चौथे ऑलिम्पिक असले तरी आई झाल्यानंतरचे हे तिचे पहिलेच ऑलिम्पिक आहे. तिला दीड वर्षाची गोंडस मुलगी आहे. आपल्या कुटुंबाबाबत बोलताना दिपिका म्हणते, "मी माझ्या मुलीला मिस करते. मी माझ्या पतीशी आणि मुलीशी रोज बोलत असते. आज स्पर्धा सुरु होण्याआधीही मी त्यांच्याशी फोनवर बोलूनच निघाले. माझी मुलगी तिकडे खुश आहे. ती मला फोनवर असताना फारशी भाव देत नाही. म्हणूनच मी तिच्याशी रोज बोलते. म्हणजे ती मला विसरणार नाही", असे दिपिका मजेशीरपणे म्हणाली.
दिपिकाचा पती अतानु दास हा देखील एक उत्तम तिरंदाज होता. त्यानेही भारताकडून ऑलिम्पिक खेळले आहे. अतानुने आपली पत्नी दिपिका हिच्यासाठी खास संदेश दिला आहे की, कणखर होऊन खेळा आणि लढाऊ वृत्ती मनात ठेवून स्पर्धेत खेळा.
दरम्यान, या संघात असलेल्या अंकिता भकट हिचे हे पहिलेच ऑलिम्पिक आहे. तिने ६६६ गुणांची कमाई केली. हा तिचा यंदाच्या हंगामातील सर्वोत्तम स्कोअर आहे. मात्र ती एवढ्यावरच समाधानी नाही. मी केलेली कामगिरी हंगामातील सर्वोत्तम कामगिरी आहे हे मला माहिती आहे पण मी आणखी चांगली कामगिरी करू शकले असते. यापुढे माझा हाच प्रयत्न असेल," असे अंकिता स्पर्धेनंतर म्हणाली.
भारतीय महिला तिरंदाजी संघाने रँकिंग इव्हेंट म्हणजे क्रमवारी निश्चित करण्यासाठी झालेल्या पात्रता फेरीत चौथे स्थान मिळवल्याने तिरंदाजी संघाची सुरुवात नक्कीच दमदार झाली आहे. यंदाच्या ऑलिम्पिकसाठी गेलेल्या प्रत्येक भारतीय खेळाडूला ही कामगिरी प्रेरणा देईल.