नवी दिल्ली : लोढा समितीने शिफारस केलेल्या ‘एक राज्य एक मत’विषयी मला कुठलीच समस्या नाही. आमच्या संघटनेला असोसिएट सदस्याच्या रूपाने रेलिगेशन स्वीकारणे ही गोष्ट कठीण जाणार, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी खजिनदार व महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अजय शिर्के यांनी म्हटले आहे.लोढा समितीने व्यापक शिफारसी केल्या आहेत. यात ‘एक राज्य एक मत’ या शिफारसीचा समावेश आहे. ही शिफारस लागू झाली तर मुंबई, महाराष्ट्र आणि विदर्भ यांच्यातील फक्त एकट्यालाच मतदानाचा अधिकार मिळणार आहे. बाकी दोन असोसिएट सदस्याच्या रूपाने रेलिगेट होणार.आपला मतदानाचा अधिकार कायम राहावा, अशी इच्छा व आशा नाही. उलट मी लोढा समितीच्या शिफारशींचे समर्थन करतो. मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून क्रिकेट प्रशासनात आलेलो नाही. या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या नाहीत. त्यामुळे आव्हान देण्याचा प्रश्नच येत नाही. मला लोभ असता तर २०१३ वर्षी आयपीएल वाद झाला होता, त्या वेळी बीसीसीआयच्या कोषाध्यक्षपदावरून राजीनामा दिला नसता; परंतु ८० वर्षे जुन्या संघटनेला रेलिगेट करून असोसिएट सदस्य कसे करू शकतात, असे शिर्के यांनी म्हटले. मुंबई क्रिकेट संघटना ही सीनियर आहे. त्यामुळे मतदानाचा अधिकार त्यालाच मिळणार. आपल्याला मुंबई अथवा विदर्भ क्रिकेट संघटनेकडे कुठलीही समस्या असेल तर ती मी फोन करून उपाय काढीन. मला न्यायालयातही जाण्याची गरज नाही, असे शिर्के यांनी पुढे सांगितले. हे माझे विचार आहेत. याच्याशी बीसीसीआय किंवा महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचा काहीच संबध नाही, असेही त्यांनी म्हटले. (वृत्तसंस्था)
बीसीसीआयचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारणे कठीण : अजय शिर्के
By admin | Published: January 05, 2016 11:58 PM