नवी दिल्ली : ‘मॅटवर उतरण्याआधीच डोक्यात पदकाचा विचार असतो. पण पदकाविना परतल्यानंतर लोकांंचा सामना कसा करावा लागतो, हे केवळ आम्हाला ठाऊक आहे. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे कठीण होऊन जाते. कुणी बोट ठेवणार नाही, अशी कामगिरी करायला आवडते. ज्याचे उत्तर आमच्याकडे नाही, अशा प्रश्नांचा सामना करावा लागू नये, असा खेळाडूंचा प्रयत्न असतो’ असे आॅलिम्पिक पदक विजेती मल्ल साक्षी मलिक म्हणाली.गेल्या काही स्पर्धांत अपेक्षित कामगिरी झाली नाही, अशी कबुली देत साक्षीने कामगिरी उंचाविण्यासाठी प्रयत्न केले. प्रयत्नांमध्ये कुठलीही उणीव नव्हती, असेही तिने सांगितले.हरियाणाच्या २५ वर्षीय साक्षीला एप्रिलमध्ये राष्टÑकुल स्पर्धेत कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. त्यानंतर इस्तंबुलमध्ये झालेल्या स्पर्धेत पदकाआधीच ती पराभूत झाली. आगामी आशियाईसाठी आयोजित चाचणीतून विनेश फोगाट, सुशील कुमार व बजरंग पुनिया यांच्यासह साक्षीला सूट देण्यात आली. सुशील व साक्षी यांचे फॉर्ममध्ये नसणे चिंतेचा विषय असल्याचे कुस्ती महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले.साक्षीने लखनऊ येथे सरावानंतर तयारीबाबत सांगताना मत मांडले. ती म्हणाली,‘रिओ आॅलिम्पिकनंतर मी अनेक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली. खेळाडूंच्या आयुष्यात नेहमी चढउतार येतातच. पण आम्ही शंभर टक्के योगदान देण्याचा तसेच देशासाठी गौरवास्पद कामगिरी करण्याचाच विचार करतो.’ (वृत्तसंस्था)>साक्षी आशियाई स्पर्धेमध्ये ६२ किलो वजन गटात सहभागी होईल. आशियाईआधी मानसिकदृष्ट्या स्वत:ला सज्ज करण्याची गरज असल्याचे मत साक्षीने मांडले.ती म्हणाली, ‘मानसिकदृष्ट्या आणखी भक्कम होण्याची गरज आहे. क्रीडा मानसोपचार तज्ज्ञाने मला लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला असून सकारात्मक विचारसरणीचा सल्ला दिला आहे. दररोज झोपण्याआधी मी पराभवाचे विश्लेषण करते.’
स्पर्धेतून पदकाविना परतल्यास चाहत्यांचा सामना करणे कठीण असते - साक्षी मलिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 3:36 AM