ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २९ : लंडन आॅलिम्पिकनंतर खेळातील नियम पुर्णपणे बदलले आहेत. त्यामुळेच रिओ आॅलिम्पिकमधील भारतीय नेमबाजांच्या कामगिरीविषयी भाकीत करणे अत्यंत कठीण ठरेल, असे भारताची माजी आॅलिम्पियन नेमबाज अंजली भागवतने सांगितले.
५ आॅगस्ट पासून सुरु होणाऱ्या आॅलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाजांबद्दल अंजलीने सांगितले की, स्पर्धेतील पदकाच्या अपेक्षाविषयी बोलणे कठीण आहे. लंडन आॅलिम्पिकनंतर सगळेच नियम बदलले आहेत आणि आता पात्रता फेरीचे गुण अंतिम फेरीतील गुणांसह जोडले जात नाही. निशानेबाजाला अंतिम फेरीत पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागते. अंतिम फेरीतील गुणावरुनंच पदक निश्चित होणार असल्याने अंतिम फेरीत सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्यावर खेळाडूंना लक्ष केंद्रीत करावे लागेल. त्यामुळेच अंतिम फेरीत पोहचल्यानंतर खेळाडूंना पात्रता फेरीतील कामगिरी पुर्णपणे विसरुन नव्याने सुरुवात करावी लागेल.
त्याचप्रमाणे, पदकासाठी नेमबाजांकडून सर्वाधिक अपेक्षा करण्यात येत आहे. त्यामुळेच यावरुन स्पष्ट होते की, नेमबाजीने आॅलिम्पिकमध्ये नवी उंची गाठली आहे. आपले नेमबाज चांगल्या तयारीने रिओमध्ये जात आहेत. त्यांची मजबूत तयारी झाली असून प्रत्येक नेमाबजाकडे अत्याधुनिक साहित्य आहेत. गेल्या दोन वर्षांत त्यांनी जे काही मिळवले आहे त्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे, असेही अंजलीने यावेळी सांगितले.
पदक मिळवण्यासाठी अंजलीने पिस्तूल नेमबाज जीतू रायला अधिक पसंती देताना सांगितले की, जीतू जेव्हा खेळतो तेव्हा त्याच्यावर कोणताच दबाव नसतो. जागतिक अजिंक्यपद आणि विश्वचषक स्पर्धेत पदक जिंकून हे त्याने सिध्द केले आहे. माझ्यामते सेनादलाचा असल्याने त्याच्यामध्ये शिस्त अधिक आहे आणि दबाव झेलण्याची क्षमताही अधिक आहे.अभिनव बिंद्राची गोष्टच निराळी आहे. त्याने आपल्या अखेरच्या आशियाई स्पर्धेत कोरिया आणि जपानच्या जागतिक दर्जाच्या नेमबाजांना मागे टाकून सुवर्ण जिंकले. रिओ स्पर्धा बिंद्राची अखेरची आॅलिम्पिक असल्याने माझ्यामते आशियाई स्पर्धेसारखेच यश तो यावेळी मिळवेल.