- डेव्हिड ली
माझ्यासाठी मागचा आठवडा फारच रोमांचक ठरला. मी प्रो व्हॉलिबॉल लीगशी जुळण्याचा निर्णय घेतला तेव्हा स्पर्धेच्या अनेक शक्यतांबाबत मनात होतेच. पण लीग पुढे सरकत असताना माझ्या विचारशक्तीच्या तुलनेत कैकपटींनी हा अनुभव मोठा असल्याची खात्री पटली.रविवारी आम्हाला अखेरचा साखळी सामना चेन्नई स्पोर्टस्विरुद्ध खेळायचा असून, गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखण्यासाठी माझ्या संघाने कंबर कसली आहे. संघाला उच्च दर्जाचा खेळ करण्याचा चांगला अनुभव आहे. प्रभागकरण, उक्करा, मनू आणि माझ्या खांद्यावर संघाच्या चांगल्या कामगिरीची जबाबदारी आहे, सुरेश खोईवालासारखे युवा खेळाडू आमच्या सोबतीला आहेत.ब्लॅक हॉक हैदराबादविरुद्ध सुरेशने आम्हाला मोक्याच्या क्षणी लय मिळवून दिली. मला दोन युवा खेळाडूंनी प्रभावित केले, त्यातील सुरेश एक आहे. दुसरा ‘कालिकत हिरोज’चा अजित लाल आहे.आमचा कर्णधार उक्करा स्वत:ची भूमिका चोखपणे बजावतो. विपरीत परिस्थितीत त्याची संयमी वृत्ती मला सर्वाधिक प्रभावित करते. याशिवाय चाहत्यांकडून मिळणारी ऊर्जा प्रेरणादायी असते.व्हॉलिबॉलमध्ये चाहत्यांकडून मिळणारी ऊर्जा खेळाडूंना रोमांचित करतेच, शिवाय अव्वल स्थान टिकविण्यासाठी कठोर मेहनत घेण्याची जाणीवही करून देते. अशा वेळी आमच्या चाहत्यांचा वेळ व पैसा सार्थकी लावण्याचा आमचाही प्रयत्न असतो.लीगमधील कडवी स्पर्धा गुणतालिकेच्या आधारे ठरविता येणार नाही. एक-दोन वगळता अन्य सामने फारच रोमहर्षक झाले. सामने अखेरपर्यंत कुणाकडेही झुकलेले दिसले नाहीत, हेच तर या लीगचे खास वैशिष्ट्य आहे. आता आमचे लक्ष्य चेन्नईविरुद्ध विजयी लय कायम राखणे हेच असेल. हाच फॉर्म आम्हाला बाद फेरीतही कायम ठेवायचा आहे. असे करू शकल्यास आम्ही अंतिम सामना खेळू, असा चाहत्यांना शब्द देऊ इच्छितो.
(टीसीएम)(लेखक आॅलिम्पिक सुवर्ण विजेते असून पीव्हीएलमध्ये कोच्ची ब्ल्यू स्पायकर्सचे खेळाडू आहेत.)