ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. ७ - बरोबर आजच्याच दिवशी ४१ वर्षांपूर्वी क्रिकेटमध्ये वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पहिली वर्ल्डकप स्पर्धा इंग्लंडमध्ये भरवली होती. प्रुडेनशियल कंपनीने स्पर्धेला प्रायोजकत्व दिल्याने पहिला वर्ल्डकप प्रुडेनशियल वर्ल्डकप म्हणून ओळखला जातो.
सात जून ते २१ जून १९७५ या कालावधील ही स्पर्धा झाली होती. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि पूर्व आफ्रिका असे आठ देश पहिल्या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यावेळी श्रीलंका आणि पूर्व आफ्रिका हे दोन देश वगळता अन्य सहा देशांना कसोटी खेळणा-या देशांचा दर्जा प्राप्त होता.
आठ संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली होती. प्रत्येक संघ आपल्या गटातील संघा बरोबर खेळणार होता. त्यातून पहिले दोन संघ उपांत्यफेरीत प्रवेश करणार असा स्पर्धेचा फॉरमॅट होता. त्यावेळी एकदिवसीय क्रिकेट ६० षटकांचे होते आणि सर्व संघांना एकच सफेद रंगाचा पोषाख होता. १९९२ वर्ल्डकपपासून क्रिकेटमध्ये रंगीत पोषाखाची सुरुवात झाली.
वर्ल्डकपमध्ये भारताची कामगिरी
ग्रुप ए मध्ये भारताच्या गटात इंग्लंड, न्यूझीलंड आणि पूर्व आफ्रिका हे संघ होते. पूर्व आफ्रिके विरुद्धचा सामना वगळता भारताने इंग्लंड आणि न्यूझीलंड विरुद्ध सामना गमावल्याने प्राथमिक फेरीतच भारताचे आव्हान संपुष्टात आले. ग्रुप ए मधून इंग्लंड, न्यूझीलंड हे संघ उपांत्यफेरीसाठी पात्र ठरले.
ग्रुप बी मधून वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया हे संघ उपांत्यफेरीत पोहोचले.
२१ जून रोजी ऐतिहासिक लॉडर्सच्या मैदानावर वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामना झाला. प्रथम फलंदाजी करणा-या वेस्ट इंडिजने ६० षटकात २९१ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा डाव २७४ धावांवर संपुष्टात आला. अशा त-हेने वेस्ट इंडिजने १७ धावांनी विजय मिळवून पहिला वर्ल्डकप जिंकला.
या स्पर्धेत न्यूझीलंडच्या ग्लेन टर्नरने सर्वाधिक ३३३ धावा केल्या.
या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या गॅरी गिलमाऊरने सर्वाधिक ११ गडी बाद केले.