ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ७ - वर्ल्डकपसाठीच्या भारतीय संघात युवराज सिंगची वर्णी न लागल्याने नाराज असलेले युवराजचे वडिल योगराज सिंग यांचा धोनीविरोध सुरुच आहे. महेंद्रसिंग धोनी हा रावणासारखाच अहंकारी असून एक दिवस त्यांचा अहंकार मोडेल व त्याला कंगाल होऊन भीक मागावी लागेल असा तिखट शब्दात योगराज सिंग यांनी धोनीवर टीकेची झोड उठवली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्डकपमधील भारतीय संघात युवराज सिंगचा समावेश न केल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. २०११ मधील वर्ल्डकपचा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ठरलेल्या युवराज यंदाच्या वर्ल्डकपमध्ये स्थान न मिळाल्याने महेंद्रसिंग धोनीवर टीका होत आहे. युवराज सिंगचे वडिल व माजी क्रिकेटपटू योगराज सिंग यांनी तर धोनीविरोधात मोहीमच उघडली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये योगराज सिंग यांनी धोनीवर आक्षेपार्ह टीका केली. योगराज म्हणाले, धोनी हा अतिशय अहंकारी व्यक्ती असून याबाबतीत तो रावणापेक्षाही वरचढ आहे. ज्यापद्धतीने रावणाचा अहंकार मोडला होता त्याचप्रमाणे धोनीचाही अहंकार मोडला जाईल. प्रसारमाध्यमांनी धोनीला हिरो बनवले असून प्रत्यक्षात धोनीमध्ये तेवढी कुवतच नाही असे त्यांनी म्हटले आहे.
२०११ मधील वर्ल्डकपमधील फायनलमध्ये धोनी स्वतः चौथ्या क्रमांकावर उतरला व संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. मग यंदाच्या वर्ल्डकपमधील सेमीफायनलमध्ये धोनी चौथ्या क्रमांकावर का आला नाही असा सवालही योगराज सिंग यांनी उपस्थित केला.