कोलंबो : ‘दिग्गज राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली खेळण्याचा अनुभव शानदार ठरणार आहे. कायम शांत आणि एकाग्रतेने काम करणाऱ्या द्रविड यांच्याकडून श्रीलंका दौऱ्यात शिकण्यासाठी खूप उत्सुक असून, यावेळी नव्याने सुरुवात करण्याचा प्रयत्न करेन,’ अशी प्रतिक्रिया आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शानदार पदार्पण केलेल्या सूर्यकुमार यादव याने दिली.आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानंतर मायदेशात झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतून सूर्यकुमारने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पहिल्याच सामन्यात त्याने अर्धशतक झळकावत आपली क्षमता सिद्ध केली होती. सध्या शिखर धवनच्या नेतृत्वात श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघातील प्रमुख फलंदाजांपैकी एक म्हणून सूर्यकुमारचा समावेश आहे.मुंबईकर सूर्यकुमारने प्रसारमाध्यमांशी ऑनलाइन संवाद साधताना म्हटले की, ‘मालिकेत दबाव असणारंच. कारण दबाव नसेल तर मजा येणार नाही. हे एक मोठे आव्हान असेल आणि यासाठी मी अत्यंत उत्सुक आहे. इंग्लंडविरुद्धची मालिका माझ्यासाठी पूर्णपणे वेगळे आव्हान होते. जेव्हापण तुम्ही मैदानात पाऊल ठेवता, तेव्हा तुम्ही वेगळा खेळ सादर करता. प्रत्येक वेळी नवी सुरुवात होत असते. लंका दौऱ्यातही मला नव्याने सुरुवात करायची आहे. इंग्लंडविरुद्धची मालिका वेगळी होती आणि आता ही श्रीलंकेविरुद्धची मालिका वेगळी आहे. मात्र आव्हान तसेच आहे. त्यामुळे मला कामगिरीत सातत्य राखायचे आहे.’द्रविडच्या मार्गदर्शनाखाली खेळण्याबाबत सूर्यकुमार म्हणाला की, ‘प्रत्येक खेळाडूसाठी ही शानदार संधी आहे. सध्याच्या परिस्थितीत प्रवास करणे मोठे आव्हान आहे. मात्र, दौऱ्याची सर्वात चांगली बाब म्हणजे राहुलसर जवळपास राहणार आहेत. मी त्यांच्याविषयी खूप ऐकले आहे. त्यांच्यासोबत हा माझा पहिलाच दौरा आहे. मी अनेक खेळाडूंकडून ऐकले आहे की, ते प्रशिक्षक म्हणून अत्यंत शांत आणि एकाग्र आहेत.’
गोलंदाजीचा निर्णय हार्दिकच घेईल गेल्या अनेक महिन्यांपासून दुखापतीने त्रस्त असलेल्या अष्टपैलू हार्दिक पांड्याने सराव सामन्यात आणि नेट्समध्ये गोलंदाजी केली. याविषयी सूर्यकुमार म्हणाला की, ‘इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत हार्दिकने गोलंदाजी केली. आयपीएलमध्ये त्याने गोलंदाजी केली नव्हती. यानंतर इंट्रा-स्क्वाड (सराव सामना) लढतीत आणि सराव सत्रामध्येही त्याने गोलंदाजी केली. सामन्यातील गोलंदाजीचा निर्णय त्याच्यावर आणि संघ व्यवस्थापनावर अवलंबून आहे. पण तो गोलंदाजी करतोय, हे मात्र नक्की. ही खूप चांगली बाब आहे.’