पॅरिस : युरो कपच्या उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित करण्यासाठी झालेल्या अत्यंत रोमहर्षक सामन्यात इटलीने बलाढ्य स्पेनचा धडाका २-० असा रोखला. या शानदार विजयासह इटलीने इतर प्रतिस्पर्धी संघांना धोक्याचा इशारा दिला आहे. दखल घेण्याची बाब म्हणजे, शनिवारी होणाऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात इटलीसमोर जगज्जेत्या जर्मनीचे तगडे आव्हान असेल. त्यामुळे या हायव्होल्टेज सामन्याकडे साऱ्या फुटबॉलविश्वाचे लक्ष असेल.आक्रमक सुरुवात करून सामन्यावर वर्चस्व मिळविल्यानंतर इटलीला काही वेळाने स्पेनकडून जोरदार प्रत्युत्तर मिळाले. ३३ व्या मिनिटाला चिलीनी याने अप्रतिम कौशल्य दाखवताना एडरच्या ताकदीवर फ्री कीकला उत्कृष्टपणे गोलजाळ्याची दिशा देत इटलीला १-० असे आघाडीवर नेले. दुसऱ्या सत्रात बचावावर अधिक भर देत स्पेनला आक्रमणापासून रोखले. निर्धारित वेळेनंतर मिळालेल्या अतिरिक्त वेळेत पुन्हा एकदा इटलीने आक्रमण केले आणि पेलेने मिळालेल्या संधीचा फायदा घेत संघाला २-० अशी भक्कम आघाडी मिळवून देत स्पेनचे आव्हान संपुष्टात आणले. (वृत्तसंस्था)
इटलीचा स्पेनला धक्का
By admin | Published: June 28, 2016 6:19 AM