फुटबॉलची लोकप्रियता संपूर्ण युरोप खंडात वाढत होती. या खंडात खेळाचे संचालन करणारी एक संघटना असावी, या उद्देशाने १९५० साली यूएएफए अर्थात युनियन आॅफ युरोपियन फुटबॉल असोसिएशनची स्थापना झाली. या संघटनेच्या अधिपत्याखाली एखादी स्पर्धा असावी, अशी काही पदाधिकाऱ्यांची मानसिकता होती. यातूनच युरोप खंडातील फुटबॉल देशाची एक स्पर्धा व्हावी, अशी कल्पना मूळ धरू लागली होती. फ्रेंच क्रीडा दैनिक ला ‘इक्विप’ने ही संकल्पना जाहीरपणे मांडली, असे असले तरी खूप पूर्वी म्हणजे पहिल्या विश्वचषकाच्याही अगोदर यूएएफएचे जनरल सेक्रेटरी हेन्री डेलौनी यांनी १९२७ साली अशी स्पर्धा व्हावी, असा प्रस्ताव फिफाकडे सादर केला होता. पण, फिफाकडून याला कोणताच प्रतिसाद मिळाला नव्हता. यूएएफए अस्तित्वात आल्यानंतर याला गती मिळाली. १९५४ साली यूएएफएच्या बैठकीत हेन्री यांनी युरोपियन चॅम्पियनशीप प्रत्यक्षात आणण्यासाठी त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली. या समितीकडे तीन प्रमुख कामे होती. १) संभाव्य स्पर्धेच्या सामन्यांची संख्या नियंत्रित करणे, २) या स्पर्धेमुळे फिफा विश्वचषक स्पर्धेची हानी होणार नाही, याची काळजी घेणे आणि ३) एकाच गटात दोन संघांच्या वारंवार लढती टाळणे. पण या समितीने आपला अहवाल देण्यापूर्वीच १९५५ साली हेन्री यांचा मृत्यू झाला. त्यांच्यानंतर त्याचा मुलगा पैरे डेलौनी यांनी त्यांच्या वडिलांना अपेक्षित असणारा स्पर्धेचा मसुदा तयार केला आणि १९५७ साली यूएएफए काँग्रेसने ‘युरोपियन नेशन्स कप’ची घोषणा केली. ज्यांनी या स्पर्धेचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्ण करण्यासाठी आयुष्य वेचले, त्या हेन्री डेलौनी यांचे नाव चषकाला देण्यासाठी कोणाचेच दुमत नव्हते. सुरुवातीला युरोपियन नेशन्स कप नावाने अस्तित्वात आलेली ही स्पर्धा १९६८ पासून युरोपियन चॅम्पियनशीप या नावाने ओळखली जाऊ लागली.स्पर्धेची घोषणा १९५७ ला झाली असली, तरी पहिली स्पर्धा १९६० साली फ्रान्समध्ये भरवण्यात आली. पहिल्या स्पर्धेत १७ संघांनी भाग घेतला. होम आणि अवे या फॉरमॅटमध्ये सामने झाल्यानंतर स्पेन, रशिया, झेकोस्लोव्हिया आणि युगोस्लोव्हिया हे चार संघ उपांत्य फेरीत आले. परंतु राजकीय घडामोडींमुळे स्पेनने रशियात सामना खेळण्यास नकार दिल्यामुळे रशिया अंतिम फेरीत पोहोचला, तर झेकोस्लोव्हियाला हरवून युगोस्लोव्हियाने अंतिम फेरी गाठली. पॅरिसमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात रशियाने युगोस्लोव्हियाला २-१ अशा गोल फरकाने हरवून पहिला युरोपियन चॅम्पियनशीप जिंकण्याचा बहुमान मिळवला.
असा झाला युरो कपचा श्रीगणेशा
By admin | Published: June 01, 2016 3:30 AM