कराची : भारत-पाक यांच्यात प्रस्तावित क्रिकेट मालिका पुढील महिन्यात जानेवारीत न झाल्यास वर्षभरात ही मालिका होणे कठीण असल्याचे मत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांनी व्यक्त केले आहे.शहरयार म्हणाले, ‘‘उभय संघांना वर्षभर भरगच्च क्रिकेट खेळायचे असल्याने ही मालिका वेळेत न झाल्यास ती वर्षभर होऊ शकेल, असे मला वाटत नाही. भारतासोबत द्विपक्षीय मालिकेचे आयोजन आणि टी-२० विश्वचषकात पाकचा सहभाग या दोन्ही बाबी भिन्न आहेत. टी-२० आयसीसीची स्पर्धा असल्याने संघ खेळायला पाठविण्यासाठी पीसीबीला सरकारची परवानगी घ्यावी लागेल. आम्ही स्थितीवर नजर ठेवून आहोत. भारतात पाक संघ पाठवायचा झाल्यास सरकारकडून परवानगी घेतल्यानंतरच खेळणे शक्य होईल.’’श्रीलंकेत लहान मालिका खेळण्याबाबत भारत सरकारने संघाला अद्याप परवानगी बहाल केली नसल्याबद्दल शहरयार निराश दिसले. ते म्हणाले, ‘‘मालिका अयोजनाबद्दल माझ्या प्रयत्नांवर काही जण टीका करीत असल्याची मला जाणीव आहे. पण ही मालिका झाली किंवा नाही तरी भारताने उभय बोर्डात झालेल्या समझोत्याचा सन्मान राखायला हवा, असे माझे मत आहे.’’ भारताने मालिका न खेळल्यास पाकला आर्थिक फटका बसेल, मात्र आम्ही दिवाळखोरीत निघणार नसल्याचे शहरयार यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘पीसीबीची आर्थिक स्थिती चांगलीच आहे. मालिका न झाल्यास काही अडचण जाणवेल, पण आम्ही आर्थिक डबघाईस आलो असे कुणी समजू नये. भारताविरुद्ध मालिका आयोजनाची आशा सोडलेली नाही. मालिका लवकर व्हावी, ही पीसीबीची इच्छा आहे. आम्ही आणखी काही दिवस भारताच्या होकाराची वाट पाहू.’’ ईसीबी अध्यक्ष जाईल्स क्लार्क हे यासंदर्भात मध्यस्थाची भूमिका बाजावत असल्याचे शहरयार यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
तर मालिका होणे कठीणच : शहरयार
By admin | Published: December 12, 2015 12:14 AM