ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २० : रिओ आॅलिम्पिकमध्ये इतिहास रचणाऱ्या दीपा कर्माकरचे देशभरात स्वागत, कौतुक होत आहे. परंतु, त्रिपुराच्या या जिम्नॅस्टला आयुष्य बदलणारे ते क्षण अजूनही आठवतात. रिओ आॅलिम्पिकमधील आपल्या वॉल्ट स्पर्धेच्या फायनलच्या क्षणांना आठवून दीपा म्हणते की, फायनलमध्ये पोहोचल्यावर पुढील सात दिवस माझ्यासाठी सात वर्षांसारखे होते. देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मला अंतिम फेरी खेळायची होती आणि मी देशाला पदक भेट देऊ इच्छित होते.
परंतु, दुर्दैवाने माझी इच्छा पूर्ण झाली नाही. मी परफॉर्म केला तेव्हा मी दुसऱ्या स्थानावर पोहोचले होते. त्याचवेळी मला कळाले होते की, मी चौथ्या स्थानावर घसरू शकते. मात्र, भारतीय महिला जिम्नॅस्टिकचा इतिहास मी बदलला, याचा मला आनंद वाटत आहे.स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सर्व देशाने एक तासभर माझा खेळ पाहिला. यापूर्वी जिम्नॅस्टिकला फार कमी पाहिले जायचे. परंतु, त्यादिवशी संपूर्ण देशाने मला खेळताना पाहिले. मी चौथ्या स्थानावर राहिले असले तरी हा क्षण माझ्यासाठी आयुष्यभर संस्मरणीय ठरला होता. पुढील २०२० च्या आॅलिम्पिकमध्ये मी देशाला पदक मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे.