ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 20 - चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम लढतीत भारतीय संघाच्या झालेल्या अनपेक्षित पराभवाने क्रिकेटप्रेमींना धक्का बसला असतानाचा माजी कर्णधार राहुल द्रविडने संघाच्या भवितव्याबाबत भाष्य करून खळबळ उडवून दिली आहे. 2019 साली होणाऱी विश्वचषक स्पर्धा नजरेसमोर ठेऊन भारतीय संघाने युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनीच्या भवितव्याबाबत निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असे राहुल द्रविडने म्हटले आहे.
एका क्रिकेट संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत द्रवि़ड म्हणाला, युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनी या दोन ज्येष्ठ क्रिकेटपटूंच्या भवितव्याबाबत विचार करण्याची वेळ आली आहे. पुढील दोन वर्षांसाठी मंडळाने काय योजना आखली आहे. 2019च्या विश्वचषकात हे क्रिकेटपटू काय भूमिका बजावतील, त्यांच्यापैकी एकाला संधी मिळेल का, असा प्रश्न द्रविडने उपस्थित केला आहे. तसेच या दोघांचे भवितव्य ठरवताना मंडळाकडून युवा खेळाडूंकडे लक्ष देण्यात येईल का, अशी विचारणाही द्रविडने केली आहे.
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड करताना अनुभवी खेळाडूंना प्राधान्य देण्यात आले आहे. मग अशा परिस्थितीत अंतिम संघामध्ये युवा खेळाडूंना स्थान मिळणार आहे का, असा प्रश्नही द्रविडने केला आहे.