नवी दिल्ली : अष्टपैलू रवींद्र जडेजाचे जवळजवळ १४ महिन्यांच्या कालावधीनंतर भारतीय कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. बीसीसीआय राष्ट्रीय निवड समितीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी जाहीर केलेल्या भारताच्या १६ सदस्यांच्या संघात केवळ एकमेव बदल करण्यात आला. त्याचवेळी अनुभवी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगला मात्र पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी निवडण्यात आलेले नाही. निवड समितीने अखेरच्या दोन वन-डे सामन्यांसाठी संघात एक बदल करताना उमेश यादवच्या स्थानी वेगवान गोलंदाज श्रीनाथ अरविंदची निवड केली. संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीच्या बैठकीनंतर बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी संघाची घोषणा केली. कसोटी मालिकेचा प्रारंभ ५ नोव्हेंबरपासून मोहालीमध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्याने होणार आहे तर उर्वरित तीन सामने बेंगळुरू, नागपूर आणि दिल्ली येथे खेळल्या जातील. अष्टपैलू जडेजाने आॅगस्ट २०१४मध्ये शेवटचा कसोटी सामना इंग्लंड विरुध्द खेळला होता. याआधी श्रीलंका दौऱ्यात त्याला कसोटीत संधी मिळाली नव्हती तसेच टी-२० आणि वन - डे तूनही डच्चू मिळाला. दक्षिण आफ्रिकेविरुध्द सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेत दुखापतग्रस्त आर. अश्विनच्या जागी अनुभवी हरभजनची वर्णी लागली, मात्र कसोटी संघात त्याची निवड झाली नाही. कसोटीत हरभजनच्या जागी जडेजाची निवड झाली. जडेजाने रणजी स्पर्धेत चमकदार कामगिरी करताना पहिल्या दोन सामन्यात ८.२५च्या सरासरीने २४ बळी घेण्याचा पराक्रम केला. या कामगिरीनेच त्याने निवडसमितीचे लक्ष वेधले. वेगवान गोलंदाज इशांत शर्माचीही संघात वर्णी लागली असून एका सामन्याच्या बंदीमुळे तो पहिल्या कसोटीमध्ये खेळू शकणार नाही.एकदिवसीय संघामध्ये श्रीनाथ अरविंदचा अपवाद वगळता इतर दुसरा बदल दिसून आला नाही. वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या जागी त्याची निवड करण्यात आली. द. आफ्रिकेविरुध्दच्या पहिल्या टी-२० सामन्यात अरविंद खेळला होता.भारतीय संघ वन-डे संघ ( अखेरच्या दोन लढतींसाठी) :- महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, सुरेश रैना, अक्षर पटेल, हरभजन सिंग, अमित मिश्रा, मोहित शर्मा, भुवनेश्वर कुमार, एस. अरविंद, स्टुअर्ट बिन्नी, अंबाती रायडू आणि गुरकिरत मान.कसोटी संघ (पहिल्या दोन लढतीसाठी) :- विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, रिद्धिमान साहा, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, लोकेश राहुल, स्टुअर्ट बिन्नी, वरुण अॅरोन आणि ईशांत शर्मा. बोर्ड अध्यक्ष इलेव्हन :- चेतेश्वर पुजारा, लोकेश राहुल, उन्मुक्त चंद, करुण नायर, श्रेयस अय्यर, नमन ओझा, हार्दिक पांड्या, जयंत यादव, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, कर्ण शर्मा आणि शेल्डन जॅक्सन.
जडेजाचे भारतीय संघात पुनरागमन
By admin | Published: October 20, 2015 12:59 AM