नवी दिल्ली : आॅस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत फॉर्ममध्ये असलेला फिरकीपटू रवींद्र जडेजाने आयसीसी क्रमवारीमध्ये चमक दाखविताना कसोटी गोलंदाजांमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. त्याचवेळी, रविचंद्रन आश्विनची द्वितीय स्थानी घसरण झाली आहे. तसेच, तिसऱ्या कसोटीमध्ये शानदार द्विशतक ठोकलेल्या चेतेश्वर पुजाराने कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थान पटकावताना कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत द्वितीय स्थानी झेप घेतली आहे. रांची येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीमध्ये भारतीय गोलंदाज बळी मिळवण्यासाठी झगडत असताना जडेजाने कांगारुंना जखडवून ठेवत चांगलेच प्रभावित केले. या कामगिरीच्या जोरावरच त्याने क्रमवारीत झेप घेतली. आॅस्टे्रलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीनंतर जाहीर झालेल्या क्रमवारीमध्ये आश्विन आणि जडेजा संयुक्तपणे अव्वल स्थानी होते. विशेष म्हणजे १४ वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच आयसीसी क्रिकेट रँकिंगमध्ये फिरकी जोडीने अग्रस्थान पटकावले होते. त्यावेळी या दोन्ही फिरकीपटूंचे प्रत्येकी ८९२ गुण होते. आता, जडेजाने ८९९ गुणांसह अव्वल स्थान पटकावले असून आश्विन ८६२ गुणांसह द्वितीय स्थानी आहे. दुसरीकडे, फलंदाजांच्या क्रमवारीत पुजाराने मोठी झेप घेतली असून भारताचा कर्णधार विराट कोहलीची मात्र घसरण झाली आहे. पुजाराने चार स्थानांनी झेप घेताना क्रमवारीत दुसरे स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे पुजाराने आपल्या कारकिर्दीमध्ये सर्वोत्तम स्थान पटकावले असून त्याने यावेळी कोहलीला मागे टाकले. आॅस्टे्रलियाविरुद्धच्या मालिकेत अद्याप आपल्या लौकिकानुसार कामगिरी करण्यात अपयशी ठरलेला कोहली चौथ्या स्थानी घसरला आहे. त्याचप्रमाणे, आॅस्टे्रलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. तसेच, त्याने यावेळी आपल्या कारकिर्दीत सर्वाधिक गुणांची कमाई करताना एकूण ९४१ गुण मिळवले आहेत. (वृत्तसंस्था)टीम इंडिया ‘टॉप’वर कायम-च्सांघिक क्रमवारीत भारतीय संघाने अव्वल स्थान कायम राखले आहे. परंतु, दुसऱ्या स्थानासाठी मात्र मोठी रंगत निर्माण झाली आहे. सध्या आॅस्टे्रलिया सांघिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असून एक एप्रिलपासून या स्थानासाठी त्यांच्यापुढे दक्षिण आफ्रिकेचे कडवे आव्हान आहे. धरमशाला येथे होणारा चौथा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात आॅस्टे्रलिया यशस्वी ठरले, तर ते दुसऱ्या स्थानी कायम राहतील. मात्र, ते या कसोटीत पराभूत झाले आणि त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेने हॅमिल्टन येथील कसोटीत न्यूझीलंडला नमवले किंवा सामना अनिर्णित राखला तरीही आफ्रिका संघ दुसऱ्या स्थानी पोहोचेल.
जडेजा गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल
By admin | Published: March 22, 2017 12:15 AM