नवी दिल्ली : फार्मात असलेला अष्टपैलू रवींद्र जडेजाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत चमकदार कामगिरी करण्याचे बक्षीस मिळाले असून, आॅस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याचे भारतीय वन-डे संघात पुनरागमन झाले. आयपीएलच्या नवव्या पर्वासाठी १२.५ कोटी रुपयांमध्ये राजकोट संघासाठी करारबद्ध झालेला डावखुरा फलंदाज सुरेश रैनाला वन-डे संघातून वगळण्यात आले. भारतीय संघातील तीन अनुभवी, दिग्गज युवराज सिंग, आशिष नेहरा आणि हरभजन सिंग यांची आॅस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टी-२० संघात निवड करण्यात आली. बीसीसीआयच्या सिनीअर निवड समितीची शनिवारी जवळजवळ दोन तास रंगलेल्या बैठकीनंतर संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने आश्चर्यचकित करणारे निर्णय घेतले. निवड समितीने संघाच्या निवडीबाबतच्या सर्व शक्यता चुकीच्या ठरवल्या. या बैठकीला भारताचा वन-डे संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी उपस्थित होता. भारतीय संघ १२ जानेवारीपासून प्रारंभ होणाऱ्या आॅस्ट्रेलिया दौऱ्यात पाच वन-डे आणि तीन टी-२० सामने खेळणार आहे.विजय हजारे करंडक स्पर्धेत ३४ वर्षीय युवराज सिंगने पाच सामन्यांत ८५.२५ च्या सरासरीने आणि १०३.६४ च्या स्ट्राईक रेटने ३४१ धावा फटकावल्या. युवराजच्या कामगिरीच्या जोरावर पंजाब संघाने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. युवराजने भारतीय संघातर्फे अखेरचे प्रतिनिधित्व ढाका येथे विश्व टी-२० अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध केले होते. नेहराचे पुनरागमन आश्चर्यचकित करणारे आहे. नेहराने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना २०११ मध्ये खेळला होता, पण टी-२० क्रिकेटमध्ये विशेषत: आयपीएलच्या आठव्या पर्वात त्याने चमकदार कामगिरी करीत निवड समितीचे लक्ष वेधले. या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजावर निवड समितीने विश्वास दाखविला आहे. गुडघ्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे वन-डे व टी-२० संघात पुनरागमन झाले आहे. डिसेंबर २०१४ मध्ये आॅस्ट्रेलिया दौऱ्यात शमी दुखापतग्रस्त झाला होता. शमी यंदा आॅस्ट्रेलियात झालेल्या विश्वकप स्पर्धेत अखेरची आंतरराष्ट्रीय लढत खेळला होता. वेगवान गोलंदाज ईशांत शर्माचे वन-डे संघात पुनरागमन झाले आहे. आॅस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जाहीर झालेल्या भारतीय संघात मनीष पांडे, बरेंदर शरण आणि हार्दिक पांड्या यांच्या रूपाने तीन नवे चेहरे आहेत. निवड समितीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन-डे सामन्यांच्या मालिकेत निराशाजनक कामगिरी करणारा डावखुरा फलंदाज सुरेश रैनाला वन-डे संघातून वगळले, पण त्याला टी-२० संघात स्थान दिले आहे.भारतीय संघ आॅस्ट्रेलिया दौऱ्यात पहिला वन-डे सामना १२ जानेवारी रोजी पर्थमध्ये खेळणार आहे. दुसरा वन-डे १५ जानेवारी रोजी ब्रिस्बेनमध्ये, तिसरा वन-डे १७ जानेवारी रोजी मेलबोर्नमध्ये, चौथा वन-डे २० जानेवारी रोजी कॅनबरामध्ये, तर पाचवा वन-डे २३ जानेवारी रोजी सिडनीमध्ये खेळणार आहे. तीन टी-२० सामने २६, २९ आणि ३१ जानेवारी रोजी अनुक्रमे अॅडिलेड, मेलबोर्न आणि सिडनीमध्ये होतील. वन-डे संघमहेंद्रसिंह धोनी (कर्णधार व यष्टिरक्षक), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, रविचंद्रन आश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, ईशांत शर्मा, उमेश यादव, गुरकिरत सिंगमान, ऋषी धवन आणि बरेंदर शरण. इन :मनिष पांडे, रवींद्र जडेजा, ऋषी धवन, महंमद शामी, ईशांत शर्मा, बरेंदर सरन.आऊट :सुरेश रैना, अंबाती रायुडू, अमित मिश्रा, स्टुअर्ट बिन्नी, एस. अरविंद, मोहित शर्मा (दुखापतग्रस्त), हरभजन सिंग, भुवनेश्वर कुमारटी-२० संघमहेंद्रसिंह धोनी (कर्णधार व यष्टिरक्षक), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, युवराज सिंग, सुरेश रैना, रविचंद्रन आश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, हरभजन ंिसंग, उमेश यादव, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार व आशिष नेहरा. आऊट :एस. अरविंद, स्टुअर्ट बिन्नी, अमित मिश्रा, अक्षर पटेल, अंबाती रायुडू, मोहित शर्मा (दुखापतग्रस्त)
जडेजाचे पुनरागमन, रैनाला वगळले
By admin | Published: December 20, 2015 2:55 AM