जमैकाचा प्रसिद्ध खेळाडू आणि वेगाचा बादशहा उसैन बोल्ट आता कंगाल झाला आहे. त्यांची आयुष्यभराची कमाई आणि निवृत्तीचे पैसे अचानक गायब झाले. लंडन ते बीजिंगच्या रेस ट्रॅकवर धावणाऱ्या बोल्टसोबत जे काही घडलं त्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याने 8 वेळा सुवर्णपदक जिंकलं आहे. निवृत्तीनंतर आता तो पुन्हा चर्चेत आला आहे. उसैन बोल्टची 12.7 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 98 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे.
बोल्टच्या इन्वेस्टमेंट अकाऊंटमधून तब्बल 98 कोटी रुपये गेले आहेत. त्यांचे खाते SSL (Stocks and Securities Limited) कंपनीत होते. ही जमैकन गुंतवणूक कंपनी आहे. असोसिएटेड प्रेसने एका पत्राचा हवाला देत या प्रकरणाची माहिती दिली आहे. बोल्टच्या वकिलाने हे पत्र कंपनीला पाठवले असून, त्यात त्याचे पैसे परत करण्याची मागणी करण्यात आली आहे.
11 जानेवारीला फंड गायब झाल्याचं समजलं
वकिलाने पत्रात लिहिले आहे की, "आम्ही आशा करत आहोत की हे खरं होऊ नये. आमच्या क्लाइंटसोबत फसवणूक, चोरी किंवा दोन्हीचा गंभीर गुन्हा केला आहे." बोल्टला 11 जानेवारीला पहिल्यांदा कळले की त्याचा फंड गायब झाला आहे. यानंतर बुधवारी त्यांच्या वकिलांनी कंपनीकडून दहा दिवसांत पैसे परत करावेत, अन्यथा त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी मागणी केली आहे.
बोल्टच्या खात्यात होते 12.8 मिलियन डॉलर
आणखी एका रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की आठ दिवसांत पैसे परत न केल्यास, बोल्ट हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेण्याचा विचार करत आहे. बोल्टच्या खात्यात 12.8 मिलियन डॉलर होते. जो त्याच्या निवृत्तीचा आणि बचतीचा भाग होता. त्याचे वकील लिंटन पी. गॉर्डन यांनी सांगितले की, आता बोल्टकडे फक्त 12,000 डॉलर म्हणजेच 10 लाख रुपये शिल्लक आहेत. त्याच वेळी, कंपनीने याबाबत माहिती दिलेली नाही. आजतकने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"