Jannik Sinner vs Daniil Medvedev Australian Open 2024 - इटलीच्या जॅनिक सिन्रने ऑस्ट्रेलियन ओपन २०२४ मध्ये पुरुष एकेरीचे जेतेपद पटकावले. रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोव्हिच या तीन दिग्गजांशिवाय २०१४ नंतर प्रथमच ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेला नवा विजेता मिळाला. जॅनिकने फायनलमध्ये ०-२ अशा पिछाडीवरून कमबॅक करताना रशियाच्या मेदवेदवचा ३-६, ३-६, ६-४, ६-४, ६-३ असा पराभव केला. २२ वर्षीय सिन्रचं हे कारकीर्दितील पहिलं ग्रँड स्लॅम जेतेपद आहे. २०२२ च्या ऑस्ट्रेलियन ओपन फायनमध्येही राफेल नदालविरुद्धच्या सामन्यात मेदवेदव पहिले दोन सेट जिंकून पुढचे तीन सेट हरला होता.
सिन्र ऑक्टोबर २०२३ रोजी जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर पोहोचला होता आणि इतिहासातील सर्वोच्च क्रमांकाचा इटालियन पुरुष खेळाडू बनला आहे. सिन्रने २०२३ कॅनेडियन ओपनमध्ये मास्टर्स १००० विजेतेपदासह एकेरीमध्ये दहा एटीपी टूअर आणि दुहेरीत एक विजेतेपद जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियन ओपन २०२४ मध्ये त्याने उपांत्य फेरीच्या सामन्यात दहा वेळच्या विजेत्या नोव्हाक जोकोव्हिचचा पराभव करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. उपांत्य फेरीत त्याने ६-१,६-२, ६-७( ६-८), ६-३ असा विजय मिळवला होता.