टोकियो : वाढत्या कोरोना संक्रमणामुळे जपानमध्ये ऑलिम्पिक आयोजनासाठी विरोध होत आहे. त्यातच जपान सरकारने मात्र ऑलिम्पिक आयोजन करायचेच असे ठरविले असून, कोरोना संक्रमणाची स्थिती कमी करण्यासाठी लॉकडाऊन आणखी २० दिवसांसाठी (२० जूनपर्यंत) वाढविण्यात आला. पुढील ५० दिवसानंतर येथे ऑलिम्पिक सुरू होईल.जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी निर्णय जाहीर करताना ओसाका येथे कोरोनाबाधितांची संख्या अधिक असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण असल्याचे सांगितले. टोकियो आणि अन्य आठ शहरांमधील लॉकडाऊन पुढील सोमवारपर्यंत संपणार होते. मात्र काही विभागांमध्ये अद्यापही परिस्थिती सुधारलेली नाही. शिवाय कोरोनाग्रस्तांच्या संख्येतही गंभीर वाढ झालेली आहे. वरिष्ठ मंत्री याशुतोशी निशिमुरा यांच्यानुसार, ‘अजूनही लोक सार्वजनिकरित्या बाहेर फिरत असल्याने लॉकडाऊन वाढवावा लागेल.
आयोजन प्रेक्षकांविना?टोकियो ऑलिम्पिकला सुरुवात होण्यास दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक असून आयोजन समितीचे अध्यक्ष सेइको हाशिमोतो यांनी संकेत दिले की, कोरोना व्हायरस महामारीमुळे या स्पर्धेत स्थानिक प्रेक्षकांनाही बंदी घालण्यात येवू शकते. महामारीचा धोका बघता विदेशी चाहत्यांवर गेल्या महिन्यात बंदी घालण्यात आली. जपानने २० जूनपर्यंत आपातकालिन परिस्थिती जाहीर केली आहे.