नवी दिल्ली : भारताला आॅस्ट्रेलियात टी-२० मालिकेत ३-० ने ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा गुजरातचा २२ वर्षीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची कर्णधार महेंद्रसिंह धोनीने प्रशंसा केली. बुमराह या दौऱ्याचे फलित असल्याचे धोनीने म्हटले आहे. धोनीने गोलंदाजीची विचित्र शैली असलेल्या बुमराहची प्रशंसा करताना म्हटले की,‘मला नेहमी गोलंदाजीबाबत चिंता भासत होती. आता आगामी काही कालावधीसाठी टी-२० क्रिकेट खेळणार असल्यामुळे सध्या गोलंदाजी समतोल भासत आहे. बुमराह या दौऱ्याचे फलित आहे. गेल्या तीन लढतींमध्ये त्याने शानदार गोलंदाजी केली. बुमराहमध्ये प्रतिभा असून, त्याच्यात भेदक यॉर्कर टाकण्याची क्षमता आहे. मर्यादित षटकांच्या लढतींमध्ये यशस्वी ठरण्यासाठी यॉर्करवर हुकूमत असणे आवश्यक असते.’ बुमराहला विचित्र शैलीमुळे भारताचा लसिथ मलिंगा म्हटले जात आहे. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज साइड आर्म शैलीमुळे जगात ओळखला जातो. बुमराहची शैलीही मलिंगासोबत मिळती जुळती आहे. गुजरातच्या या वेगवान गोलंदाजाने आॅस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दोन टी-२० लढतींमध्ये आपल्या शैलीने आणि बळी घेण्याच्या क्षमतेमुळे क्रिकेट जाणकारांचे लक्ष वेधले आहे. बुमराहने टीम इंडियाच्या आॅस्ट्रेलिया दौऱ्यात सिडनीमध्ये एकमेव वन-डे सामना खेळला होता. त्यात त्याने दोन बळी घेतले होते, पण अॅडिलेड व मेलबोर्नमध्ये पहिल्या दोन टी-२० लढतींमध्ये बुमराह भारतीय गोलंदाजीचा हीरो ठरला. अॅडिलेडमध्ये त्याने २३ धावांच्या मोबदल्यात ३, तर मेलबोर्नमध्ये ३७ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. त्याने तिसऱ्या लढतीत ४३ धावांत एका फलंदाजाला माघारी परतवले. (वृत्तसंस्था)त्याचे काही तोटेही आहेत. मी गोलंदाजी शैलीबाबत मलिंगासोबत बरीच चर्चा केली. मलिंगाची शैलीही वेगळी आहे. अशा शैलीमुळे कुठेही गोलंदाजी करता येते आणि शैली बदलण्याची गरज नाही. या शैलीमुळे तुला सहजता वाटत असेल तर शैलीमध्ये बदल करण्याची काहीच गरज नाही, असे मलिंगाने मला त्या वेळी सांगितले होते.- जसप्रीत बुमराह
आॅस्ट्रेलिया दौऱ्यात गवसला जसप्रीत
By admin | Published: February 03, 2016 3:12 AM