नवी दिल्ली : आॅस्ट्रेलियाविरुद्ध २६ जानेवारीपासून होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी दुखापतग्रस्त वेगवान मोहंमद शमीच्या जागी भारतीय संघात गुजरातचा युवा खेळाडू जसप्रीत बुमराह याची निवड करण्यात आली आहे. आॅस्ट्रेलियविरुद्ध सुरू असलेल्या वन-डे मालिकेपूर्वी मोहंमद शमी याला नेटमध्ये सराव करताना दुखापत झाली होती. त्यामुळे तो संपूर्ण सिरीजमधून बाहेर झाला होता. त्याच्या जागी आता भारतीय निवड समितीने २२ वर्षीय मध्यमगती गोलंदाज बुमराह याची निवड केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले की, शमीच्या जागी टी-२० संघात निवड झालेला बुमराह टी-२० संघातील सदस्य युवराजसिंग, हरभजनसिंग, आशिष नेहरा, सुरेश रैना आणि हार्दिक पंड्या यांच्यासह २२ जानेवारी रोजी आॅस्ट्रेलियासाठी रवाना होणार आहे. या टी-२० मालिकेतील पहिली लढत २६ जानेवारी रोजी एडिलेड येथे, तर दुसरा सामना मेलबोर्न येथे २९ जानेवारी आणि तिसरा आणि अखेरचा सामना ३१ जानेवारी रोजी सिडनी येथे खेळविला जाईल. बुमराह याने मुश्ताक अली ट्रॉफीत आतापर्यंत खेळलेल्या ९ सामन्यांत गुजरातकडून १५.४२ च्या सरासरीने १४ विकेट घेतल्या आहेत. संघातील तो सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. (वृत्तसंस्था)
शमीऐवजी जसप्रीतला संधी
By admin | Published: January 19, 2016 3:23 AM