नवी दिल्ली : श्रीलंकेचा माजी कर्णधार माहेला जयवर्धनेला प्रस्तावित लीजेंड टी-२० मध्ये सहभागी होण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला. भारतीय दिग्गज सचिन तेंडुलकर व आॅस्ट्रेलियाचा शेन वॉर्न या लीगला प्रमोट करीत आहेत.जयवर्धनेच्या नजीकच्या सूत्राने सांगितले, की लीजेंड टी-२० साठी माहेलासोबत संपर्क साधण्यात आला. नाव उघड न करण्याच्या अटीवर सूत्राने सांगितले, की तेंडुलकर व वॉर्न यांच्या लीगमध्ये खेळण्यासाठी माहेलासोबत संपर्क साधण्यात आला. लीगमध्ये सहभागी होण्याचा प्रस्ताव मिळाला असून, अद्याप बऱ्याच बाबींचा खुलासा झालेला नाही.या प्रस्तावित लीजेंड टी-२० सामन्यांमध्ये जयवर्धने सहभागी होण्याची ९० टक्के शक्यता आहे. या घटनेबाबत माहिती असलेला एक अधिकारी म्हणाला, ‘‘माहेला जयवर्धनेने तिन्ही प्रकारांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. जगातील काही निवडक टी-२० लीगमध्ये तो खेळणार आहे. त्यानंतर त्याच्याकडे वेळ आहे. त्यामुळे प्रस्ताव स्वीकारण्यास कुठली अडचण दिसत नाही.’’निवृत्ती स्वीकारणाऱ्या जवळजवळ २८ क्रिकेटपटूंसोबत लीगसाठी संपर्क साधण्यात आला. या लीग स्पर्धेतील सामने अमेरिकेतील न्यूयॉर्क, शिकागो व लॉस एंजिल्स या शहरांमध्ये खेळले जाणार आहे. पहिली लीग स्पर्धा यंदा आॅगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात आयोजित करण्यासाठी योजना आखण्यात येत आहे. लीगमध्ये सर्व प्रदर्शनी सामने होणार असून, त्याला अधिकृत मान्यता मिळणार नाही, पण आयोजकांना मात्र मंजुरीसाठी आयसीसीकडे संपर्क करावा लागू शकतो. आयसीसीचा एक प्रवक्ता म्हणाला, ‘‘आयसीसीला प्रस्तावित लीगबाबत अद्याप काही माहिती मिळालेली नाही. अशा प्रकारच्या स्पर्धेच्या आयोजनासाठी एक प्रक्रिया असते. याबाबत आयसीसीसोबत संपर्क साधल्यानंतर त्याबाबत दखल घेण्यात येते.’’ वॉर्न, दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस, अॅलन डोनाल्ड, पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी, विंडीजचा ब्रायन लारा यांच्या व्यतिरिक्त ब्रेट ली, मॅथ्यू हेडन, अॅडम गिलख्रिस्ट व रिकी पॉन्टिंग या लीगमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)
लीजेंड टी-२० साठी जयवर्धनेला प्रस्ताव
By admin | Published: May 19, 2015 1:35 AM