मुंबई : घाटकोपरच्या झुनझुनवाला कॉलेजने दमदार खेळ करताना पनवेलच्या बलाढ्य पिल्लई कॉलेजला ३-२ असा धक्का देत पाचव्या इंटर कॉलेज व्हॉलिबॉल स्पर्धेत बाजी मारली. दुसऱ्या बाजूला उल्हासनगरच्या आर. के. तळरेजा कॉलेजने तिसऱ्या स्थानी झेप घेताना डोबिंवलीच्या के.एम. पटेल कॉलेजचे आव्हान परतावले.वायएमसीए शारिरीक शिक्षण विभागाच्या वतीने झुला मैदान (भायखळा) येथे व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अंतिम फेरीमध्ये दोन्ही संघांमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळाली. पहिल्या गेममध्ये पिल्लई संघाने आपल्या लौकिकानुसार अपेक्षित आघाडी घेताना २५ - २३ अशी सुरुवात केली. दुसऱ्या गेममध्ये झुनझुनवाला संघाने पुनरागमन करत २५-२३ अशा गुणांनी १-१ अशी बरोबरी केली. यानंतर पुन्हा एकदा दोन्ही संघांनी प्रत्येकी एक गेम जिंकताना २-२ अशी बरोबरी साधून सामना निर्णायक पाचव्या गेममध्ये नेला. यावेळी झुनझुनवालाच्या खेळाडूंनी तुफान आक्रमण करताना दमदार स्मॅशसह सांघिक कामगिरीच्या जोरावर अतिरिक्त गुणांची वसूली केली. अखेरच्या गेममध्ये पिल्लईच्या खेळाडूंनी केलेल्या चुकांचा फायदा घेत झुनझुनवाला संघाने अखेर २३-२५, २५-२३, १७-२५, २९-२७, १५-१० अशी बाजी मारुन विजेतेपदावर नाव कोरले. तत्पूर्वी तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात आर.के. तळरेजा संघाने आक्रमक खेळाच्या जोरावर के.एम. संघाचा सहजपणे २५-१९, २५-१३ असा धुव्वा उडवून तृतीय स्थानावर कब्जा केला. (क्रीडा प्रतिनिधी)
‘झुनझुनवाला’ची बाजी
By admin | Published: January 29, 2016 3:25 AM