लंडन : स्वित्झर्लंडच्या तृतीय मानांकित स्टॅन वावरिन्काला पराभवाचा धक्का देऊन जायंट किलर बनलेल्या फ्रान्सच्या २१व्या मानांकित रिचर्ड गास्केटची मजल अखेर उपांत्य सामन्यापर्यंतच मर्यादित राहिली. एकतर्फी झालेल्या या सामन्यात सर्बियाच्या अग्रमानांकित नोव्हाक जोकोविचने गास्केटचा सरळ तीन सेटमध्ये ७-६(२), ६-४, ६-४ असा पराभव केला आणि विम्बल्डन पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. विजेतेपदासाठी जोकोविचसमोर द्वितीय मानांकित रॉजर फेडरर आणि तृतीय मानांकित अँडी मरे यांच्यातील विजेत्याचे तगडे आव्हान असेल.उपांत्यपूर्व फेरीत वावरिन्काला नमवून खळबळ माजवलेल्या गास्केटच्या खेळीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. बलाढ्य जोकोविचने अपेक्षित विजय मिळवताना अंतिम फेरीत आगेकूच केली असली, तरी त्याला विजयासाठी गास्केटने चांगलेच झुंजवले. पहिलाच सेट टायब्रेकमध्ये जिंकताना नाकी नऊ आलेल्या जोकोविचला ही लढत सोपी नसल्याचे जाणवले. दुसऱ्या सेटचा पहिला गेम जिंकताना गास्केटने ‘जोको’ला धोक्याचा इशाराच दिला; मात्र कसलेल्या जोकोने आपला हिसका दाखवताना या सेटमध्ये आघाडी घेतली. त्याच वेळी गास्केटनेदेखील काही अप्रतिम फटके मारताना जोकोविचला पळवले. नेटजवळचे फटके खेळताना जोकोविच थोडा चाचपडताना दिसत होता; परंतु त्याने वेगवान सर्विस आणि उत्कृष्ट स्मॅश मारून ही कसर भरून काढत गास्केटला आपला गाशा गुंडाळण्यास भाग पाडले.
‘जोको’ फायनलमध्ये
By admin | Published: July 11, 2015 1:40 AM