न्यूयॉर्क : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या नोव्हाक जोकोव्हिचने अमेरिकन ओपनच्या अंतिम लढतीत ग्रॅण्डस्लॅमचा किंग असलेल्या रॉजर फेडररचा ६-४, ५-७, ६-४, ६-४ ने पराभव करीत यंदाच्या मोसमातील तिसरे आणि कारकिर्दीतील दहावे ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकाविले. पावसाच्या व्यत्ययामुळे तीन तासाचा विलंब आणि आर्थर अॅश स्टेडियममध्ये फेडररचा उत्साह वाढविण्यासाठी जमलेल्या प्रेक्षकांचे आव्हान पेलताना जोकोव्हिचने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत दुसऱ्यांदा जेतेपदाचा मान मिळवला. यापूर्वी २०११ मध्ये जोकोव्हिचने येथे जेतेपदाचा मान मिळवला होता. या पराभवामुळे ३४ वर्षीय फेडररचे ४५ वर्षांतील सर्वांत प्रौढ खेळाडू म्हणून अमेरिकन ओपनचे जेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंगले. तब्बल १७ ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद गाठीशी असलेल्या फेडररने २०१२ मध्ये विम्बल्डन स्पर्धेत अखेरचे ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकावले होते. जोकोव्हिचने यंदाच्या मोसमात आॅस्ट्रेलियन ओपन व विम्बल्डन स्पर्धेतही जेतेपदाचा मान मिळवला आहे. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत त्याला अंतिम लढतीत स्टॅनिसलास वावरिंकाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे त्याची कॅलेंडर ग्रॅण्डस्लॅम पूर्ण करण्याची संधी हुकली. जोकोव्हिचने १० ग्रॅण्डस्लॅम पटकावताना अमेरिकेच्या बिल टिल्डेनच्या विक्रमाची बरोबरी केली. जोकोव्हिच ब्योर्न ब्योर्ग व रॉड लावेर यांच्या विक्रमापासून एक ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद दूर आहे. अंतिम लढतीत फेडररने ५४ टाळण्याजोग्या चुका केल्या आणि त्याला २३ पैकी केवळ चार ब्रेक पॉर्इंटवर गुण वसूल करता आले. सामन्यानंतर बोलताना जोकोव्हिच म्हणाला, ‘मी फेडरर व त्याच्याकडून मिळणाऱ्या आव्हानांचा आदर करतो.’ आता फेडरर व जोकोव्हिच यांची एकमेकांविरुद्ध जय-पराजयाची आकडेवारी २१-२१ अशी बरोबरीत आहे. (वृत्तसंस्था)फेडररची २८ सेट जिंकण्याची मालिका खंडीत....जोकोव्हिचने पहिल्या सेटपासून वर्चस्व गाजवले. गेल्या सहा वर्षांत प्रथमच अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत खेळणारा पाचवेळचा विजेता फेडररने सहा मिनिटच्या पहिल्या गेममध्ये तीन ब्रेक पॉर्इंटचा बचाव करण्यात यशस्वी ठरला. जोकोव्हिचने त्यानंतर फेडररची सर्व्हिस भेदली. पावसामुळे कोर्ट निसरडे झाल्यामुळे जोकोव्हिच पुढच्या गेममध्ये कोर्टवर घसरून पडला, पण त्याचा त्याच्या खेळावर कुठलाच परिणाम झाला नाही. दहाव्या गेममध्ये फेडररचा बॅकहँडचा फटका नेटमध्ये गेल्यामुळे जोकोव्हिचने पहिल्या सेटमध्ये सरशी साधत आघाडी घेतली. त्यामुळे विम्बल्डनच्या अंतिम लढतीत जोकोव्हिचविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानंतर फेडररची सलग २८ सेट जिंकण्याची मालिका खंडित झाली. दुसऱ्या सेटमध्ये जोकोव्हिचने आठ मिनिटांच्या गेममध्ये पाच ब्रेक पॉर्इंटचा बचाव केला.फेडररला दहाव्या गेममध्ये दोन सेट पॉर्इंट मिळाले. त्यातील एक त्याने गमावला. फेडररने १२ व्या गेममध्ये आणखी एक सेट पॉर्इंट गमावला, पण चौथ्या ब्रेक पॉर्इंटवर गुण वसूल करीत सेट जिंकला. फेडररने १-१ अशी बरोबरी साधल्यानंतर चाहत्यांमध्ये उत्साह संचारला. तिसऱ्या सेटममध्ये जोकोव्हिचने २-१ अशी आघाडी घेतली होती, पण सर्व्हिस करताना प्रेक्षकांनी त्याचे लक्ष भंग केल्यामुळे स्कोअर २-२ असा झाला. जोकोव्हिचने आठव्या गेममध्ये दोन ब्रेक पॉर्इंटचा बचाव केला, पण त्यानंतर अचानक फेडररचे लक्ष विचलित झाल्यामुळे जोकोव्हिचने ५-४ अशी आघाडी घेतली. फेडररला दोन ब्रेक पॉर्इंटचाही लाभ घेता आला नाही. चौथ्या सेटच्या पहिल्या गेममध्ये जोकोव्हिचने फेडररची सर्व्हिस भेदली आणि त्यानंतर ब्रेंक पॉर्इंटचा बचाव करीत ४-२ अशी आघाडी घेतली.
‘जोको’ ग्रॅण्डस्लॅमचा किंग
By admin | Published: September 15, 2015 3:27 AM