नवी दिल्ली : भारताची युवा बॉक्सर सोनिया चहलने (५७ किलो) शुक्रवारी शानदार कामगिरी करताना दहाव्या एआयबीए महिला बॉक्सिंग विश्व चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली. यासह तिने भारतासाठी दुसरे रौप्यपदक निश्चित केले. सिमरनजीत कौरला (६४) कडव्या लढतीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. याआधी गुरुवारी दिग्गज मेरीकोमने अपेक्षित कामगिरी करताना अंतिम फेरी गाठली.दोन्ही भारतीय खेळाडूंच्या प्रतिस्पर्धी खेळाडू आक्रमक व चपळ होत्या. त्यात यजमान देशाच्या एका बॉक्सरच्या रणनीतीमध्ये उणीव होती तर एका बॉक्सरने अचूक पंच लगावत विजय मिळवला.या स्पर्धेत भारताच्या चार बॉक्सर्स उपांत्य फेरीत पोहचल्या होत्या. लंडन आॅलिम्पिकची कांस्यपदक विजेती मेरीकोम शनिवारी युक्रेनच्या हन्ना ओखोटाच्या आव्हानाला सामोरे जाईल.भारताने २००६ मध्ये महिला विश्व बॉक्सिंग स्पर्धेचे यजमानपद भूषविताना ३ सुवर्ण, एक रौप्य व ३ कांस्यपदकांसह एकूण ८ पदकांची कमाई केली होती. भारताची ही सर्वोत्तम कामगिरी कायम राहील. सिमरनजीत व लवलीना बोरगोहेन (६९ किलो) यांनी २ कांस्य जिंकली.सिमरनजीत पराभूतसिमरनजीत कौरला उपांत्य फेरीत चीनच्या डान डोऊविरुद्ध १-४ ने पराभव स्वीकारावा लागला. चीनची खेळाडू अंतिम फरीत युक्रेनच्या मारिया बोवाविरुद्ध लढेल.भिवानीच्या सोनियाने उपांत्य फेरीत उत्तर कोरियाच्या जोन सोनचा ५-० ने पराभव करीत अंतिम फेरी गाठरली. शनिवारी खेळल्या जाणाऱ्या अंतिम लढतीत सोनियाला जर्मनीच्या गॅब्रियल आर्नेल वाहनरच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. वाहनरने नेटरलँडच्या जेमियमा बेट्रियनचा ५-० ने पराभव केला.
जोन सोनला सोनियाचा ‘पंच’; भारताकडे दोन ‘सुवर्ण’ संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 2:49 AM