मुंबई : ‘भारताचे ज्युनिअर नेमबाज सध्या खूप चांगली कामगिरी करत आहेत. यामुळे वरिष्ठ खेळाडूंवर कोणतेही दडपण आलेले नसून भारतीय संघाला आणखी गुणवान खेळाडूंची आवश्यकता आहे,’ असे भारताची आघाडी नेमबाज हिना सिध्दू हिने म्हटले. मुंबईत गुरुवारी झालेल्या एका कार्यक्रमात तिने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ज्युनिअर नेमबाजांच्या कामगिरीविषयी हिना म्हणाली की, ‘भारताला मजबूत संघाची गरज आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत आपल्याला सांघिक गटामध्ये एकही पदक मिळवता आले नाही. त्यामुळे मोठ्य प्रमाणात गुणवान नेमबाजांची भारताला गरज असून ज्युनिअर नेमबाज सध्या चांगली कामगिरी करत आहेत.’ त्याचवेळी, हिनाने ज्युनिअर्स नेमबाजांच्या यशाचे श्रेय भारतीय प्रशिक्षकांना दिले. हिना म्हणाली की, ‘भारतात आज अनेक प्रशिक्षक चांगली कामगिरी करत आहेत. याआधी आपण विदेशी प्रशिक्षकांवर अधिक निर्भर होतो. पण आज चित्र बदलत आहेत. भारतीय प्रशिक्षक खूप चांगल्याप्रकारे मार्गदर्शन करत असून त्याचा फायदा ज्युनिअर खेळाडूंना मिळत आहेत.’ ‘भारतीय प्रशिक्षक स्वत: आपल्या काळातील चॅम्पियन राहिले आहेत. त्यामुळे जेव्हा खेळाडूंना अशा अनुभवाचे मार्गदर्शन मिळते, तेव्हा खेळाडूंकडून चांगली कामगिरी होणारच. अनुभवी भारतीय प्रशिक्षकांकडून ज्युनिअर्स खेळाडूंना खूप चांगला सराव मिळत आहे,’ असेही हिनाने यावेळी म्हटले.
कनिष्ठ नेमबाजांचे वरिष्ठ खेळाडूंवर दडपण नाही -हिना सिध्दू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 10:07 PM
भारतीय संघाला आणखी गुणवान खेळाडूंची गरज- हिना
ठळक मुद्देहिनाने कनिष्ठ नेमबाजांच्या यशाचे श्रेय भारतीय प्रशिक्षकांना दिले