पुणे : सब ज्युनिअर आणि ज्युनिअर गटांच्या स्पर्धांसह शालेय, ग्रामीण आणि आदिवासी क्रीडा स्पर्धांना महत्त्व द्यावे, यासह ग्रामीण आॅलिम्पिक स्पर्धांचे आयोजन करून त्यातून युवा खेळाडूंची निवड करून त्यांना योग्य मार्गदर्शन दिले पाहिजे. त्यासाठी पूरक क्रीडा संस्कृती आणि मानसिकता असायला हवी, तरच २०२० नाही, तर २०२४, २०२८ च्या आॅलिम्पिक स्पर्धेच्या तयारीसाठी नक्कीच फायदा होईल, अशा सूचना आॅलिंपिक टास्क फोर्सच्या राज्यस्तरीय परिषदेत मांडले गेले. क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने म्हाळुंगे-बालेवाडी येथील क्रीडा संकुलातील हॉलमध्ये केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने आॅलिम्पिकमधील पदकसंख्या वाढवण्याच्या दृष्टीने नियुक्त करण्यात आलेल्या आॅलिम्पिक टास्क फोर्सच्या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. आॅलिम्पिक टास्क फोर्सचे सदस्य गोपीचंद, संदीप प्रधान, ओम पाठक, बलदेव सिंग, वीरेन रस्किन्हा, जी. एल. खन्ना, राज्याचे क्रीडा सचिव नंदकुमार, आयुक्त राजाराम माने, सहसंचालक नरेंद्र सोपल, माजी आॅलिम्पियन, क्रीडा मार्गदर्शक स्पोर्ट कन्सल्टंट, काही शालेय आंतरराष्ट्रीय खेळाडू या वेळी उपस्थित होते. देशात होणाऱ्या ज्युनिअर, सब ज्युनिअर गटांच्या स्पर्धांसह ग्रामीण आणि आदिवासी क्रीडा स्पर्धांमधील गुणवान खेळाडूंना हेरून त्यांना योग्य मार्गदर्शन दिले तर आपल्या देशातून आॅलिम्पिक पदकविजेते नक्कीच तयार होती. यासाठी शालेयस्तरावर मेहनत घ्यावी लागेल. क्रीडा संघटनांना बरोबर घेऊन जाण्याची गरज असल्याचा मुद्दा उपस्थित बहुतेक क्रीडातज्ज्ज्ञांनी उपस्थित केला. खेळाडू घडवण्यासाठी शारीरिक शिक्षण महत्त्वाचे असल्याचेही एकमत या वेळी झाले. या वेळी ज्युनिअर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, ग्रामीण खेळाडूंसाठी आॅलिम्पिक स्पर्धा व आदीवासी खेळाडूंसाठी राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन केले पाहिजे, असे सुद्धा सूचविण्यात आले.टास्क फोर्सचे पाठक यांनीदेखील शारीरिक शिक्षण अनिवार्य करावे, अशी आपण सूचना करणार असल्याचे सांगितले. (क्रीडा प्रतिनिधी)एमओएच्या पदधिकाऱ्यांना निमंत्रणच नाही...या परिषदेत विविध क्रीडा संघटनांची राज्यातील शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र आॅलिम्पिक संघटनेच्या एमओए पदधिकाऱ्यांनाच निमंत्रण नव्हते. सरचिटणीस बाळासोहब लांडगे, खजिनदार धनंजय भोसले यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित नव्हते, यावरून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या आणि हा चर्चेचा विषय झाले होते. यासंदर्भात सहसंचालक नरेंद्र सोपल यांना विचारले असता, त्यांनी सांगितले, केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून आम्हाला मिळालेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आम्ही निमंत्रणे पाठविली. त्यांनी ज्यांना सांगितले त्यांनाच निमंत्रणे पाठविली.
ज्युनिअर, सब-ज्युनिअर स्पर्धांना महत्त्व द्यायला हवे
By admin | Published: April 20, 2017 2:49 AM