मुंबई : आयुष्यामध्ये काही गोष्ट फक्त एकदाच पाहायला मिळतात, असं म्हटलं जातं. तशीच एक गोष्ट घडली आहे. या गोष्टीचा व्हिडीओ चांगलाच वायरल झाला असून आता जगभरात हा व्हिडीओ पाहिला जात आहे. गोष्ट पण तशीच. यापूर्वी पाहायला न मिळाली अशीच आहे. एका गोलकिपरने फक्त पाच सेकंदांमध्ये दोन गोल अडवल्याचे पाहायला मिळाले आहे. ही थरारक गोष्ट तुम्हालाही पाहायला नक्कीच आवडेल.
एखाद्या गोलपोस्टवर हल्ला चढवला जातो. गोलकिपर बचाव करतो. काही वेळेला बचाव केलेला चेंडू प्रतिस्पर्धी खेळाडूंकडेही जातो. पण फक्त पाच सेकंदांमध्ये दुसऱ्यांदाच त्याच गोलपोस्टवर हल्ला केल्याचे पाहिले जात नाही. डोळ्याची पापणी लवते न लवतेच तर पाच सेकंद होऊनही जातात. पण याच पाच सेकंदांमध्ये दोनदा गोल करण्याचे प्रयत्न झाले आणि मुख्य म्हणजे त्या गोलकिपरने हे दोन्ही प्रयत्न हाणून पाडले.
आता हा जलदपणे अचूक कामगिरी करणारा गोलकिपर कोण आणि ही गोष्ट नेमक्या कोणत्या सामन्यामध्ये घडली, याची उत्सुकता तुम्हाला असेल. तर या चाणाक्ष गोलकिपरचे नाव आहे महमूद गदी. ही गोष्ट पाहायला मिळाली ती इजिप्तमधील एका प्रीमियर लीगमध्ये. पिरॅमिड्स आणि ईएनपीपीआई या दोन संघांमध्ये हा सामना रंगला होता. पण नेमके घडले काय आणि कसे, हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल.
ईएनपीपीआईच्या गोलपोस्टवर प्रतिस्पर्धी संघाने हल्ला चढवला होता. त्यावेळी चेंडू ईएनपीपीआईच्या भागामध्ये आला होता. प्रतिस्पर्धी खेळाडूने हा चेंडू गोलपोस्टच्या जवळ मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेत असताना गदीने गोलपोस्ट सोडला आणि तो धावत चेंडूच्या दिशेने गेला. यावेळी डोक्याने चेंडू मारत त्याने प्रतिस्पर्धी संघाचा गोल करण्याचा प्रयत्न फोल ठरवला. पण गदीने मारलेला हा चेंडू प्रतिस्पर्धी खेळाडूकडे गेला. त्यावेळी गदी हा गोलपोस्पेक्षा फार लांब होता. प्रतिस्पर्धी खेळाडूने या गोष्टीचा चांगलाच फायदा उचलला आणि गोलपोस्टच्या दिशेने चेंडू तटवला. हा चेंडू आता गोलपोस्टमध्ये जाणार असेल वाटत होते. पण तेवढ्याच गदी हा जोरात धावत गोलपोस्टजवळ आला आणि त्याने आपल्या डोक्याने चेंडू मैदानाबाहेर ढकलला. या दोन्ही गोष्टी गदीने फक्त पाच सेकंदांमध्ये केल्या. त्यामुळे आता जगभरात गदीचे चांगलेच कौतुक होत आहे.