कालगेरी(कॅनडा) : ज्वाला गुट्टा व अश्विनी पोनप्पा या दुहेरीतील भारताच्या आघाडीच्या जोडीने शिहो तनाका व कोहारु यानेमोटो यांना रविवारी पराभूत करत कॅनडा ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.भारताच्या या तिसऱ्या मानांकित जोडीने जपानच्या खेळाडूंचा २१-१७,२१-१६ असा सरळ पराभव केला. ज्वाला आणि अश्विनी यांना अंतिम सामन्यात सेलेना पिएक व एफ.जे. मस्किस या अग्रमानांकित जोडीशी खेळावे लागणार आहे.उपांत्यफेरीत भारताच्या या जोडीला जास्त कष्ट करावे लागले नाही. पहिल्या सेटमध्ये भारतीय जोडी पिछाडीवर होती. मात्र ४-४ अशी बरोबरी साधल्यानंतर ज्वाला व अश्विनीने मागे वळून पाहिले नाही. ९-६ अशी आघाडी घेतल्यानंतर जपानच्या खेळाडूंनी १४-१४ अशी बरोबरी साधली होती. मात्र सलग चार गुण घेत ज्वाला आणि अश्विनी यांनी त्यांच्यावर दबाव आणला. पहिला सेट जिंकल्यानंतर दूसरा सेट त्यांनी आरामात जिंकला.(वृत्तसंस्था)
ज्वाला, अश्विनी अंतिम फेरीत
By admin | Published: June 29, 2015 1:03 AM