कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची झळ क्रिकेटपटूंनाही बसली आहे. आयपीएलमध्ये सहभागी झालेले वरुण चक्रवर्थी, संदीप वॉरियर्स, अमित मिश्रा, वृद्धीमान सहा, मायकेल हस्सी, लक्ष्मीपती बालाजी यांना कोरोनाची लागण झाली. आर अश्विनच्या कुटुंबीयांतील १० सदस्यांना कोरोना झाला, युझवेंद्र चहलच्या आई-वडिलांनाही कोरोना झाला आहे. भारताची महिला क्रिकेटपटू वेदा कृष्णमुर्ती हिनं कोरोनामुळे आई व बहिणीला गमावले. अशात बीसीसीआयनं साधी तिची विचारपूसही केली नाही. आता आणखी एक क्रिकेटपटूच्या आई-वडिलांचा कोरोनाशी संघर्ष सुरू आहे आणि त्यांच्या मदतीसाठी भारताची स्टार बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा ( Jwala Gutta) पुढे आली आहे.
ज्वालानं भारताची माजी क्रिकेटपटू सरावंत नायडू (Sravanthi Naidu) हिच्यासाठी तेलंगना सरकारकडे मदत मागितली आहे. सरावंतीनं भारतासाठी चार वन डे व एक कसोटी सामना खेळला आहे. तिच्या नावावर ट्वेंटी-२०त सर्वोत्तम गोलंदाजी ( २ बाद ९ धावा) करण्याचा विक्रम आहे. तिचे आई-वडील कोरोनाचा उपचार घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये भरती आहे आणि त्यांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
ज्वालानं ट्विट केलं की,''भारताची माजी व हैदराबादची ऑलराऊंडर सरावंती नायडू हिच्या आई-वडिलांचा कोरोनाशी संघर्ष सुरू आहे. त्यांच्या उपचारासाठी तिनं आधीच १६ लाख रुपये खर्च केले आहेत. पुढील उपचारांसाठी तिला आणखी मदतीची गरज आहे. तिला आपल्या मदतीची गरज आहे.'' ज्वाला फक्त ट्विट करून थांबली नाही, तर तिनं स्वतः आर्थिक मदतही केलीय.
भारताची महिला क्रिकेटपटू वेदा कृष्णमूर्ती हिने तिची आई आणि बहिणीला गमावले आहे. मात्रा दु:खाच्या घडीमध्ये बीसीसीआयने वेदा कृष्णमूर्ती हिची साधी विचारपूसही केली नाही, असा आरोप ऑस्ट्रेलियाची माजी क्रिकेटपटू आणि समालोचक लिसा स्थळेकर हिने केला आहे. लिसा स्थळेकर हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये तिने इंग्लंड दौऱ्यासाठी जाहीर झालेल्या भारतीय संघात वेदा कृष्णमूर्तीचा समावेश न करण्याचा निर्णय़ योग्य असल्याचे म्हटले आहे. मात्र या दु:खद प्रसंगी तिच्यासोबत अजिबात संवाद न साधणे धक्कादायक आहे, असे मत लिसाने मांडले.