नवी दिल्ली : अलीकडेच पार पडलेल्या जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या महिला शिलेदारांनी ऐतिहासिक कामगिरी केली. हाच विजयरथ कायम ठेवत आता भारताच्या महिला खेळाडूंनी तिरंदाजी स्पर्धेत पुन्हा एकदा सुवर्ण पदक पटकावले आहे. खरं तर पॅरिसमध्ये तिरंदाजी विश्वचषक स्टेज ४ कम्पाऊंड महिला सांघिक स्पर्धेत भारताने सुवर्णपदक जिंकले. ज्योती, अदिती आणि परनीत या त्रिकुटाने अंतिम फेरीत WR १ मेक्सिकोचा २३४-२३३ असा पराभव करून विजयावर शिक्कामोर्तब केला.
दरम्यान, याच त्रिकुटाने काही आठवड्यांपूर्वी त्याच मेक्सिकन संघाला हरवून जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले होते. ज्योती सुरेखा वेन्नम, अदिती स्वामी आणि परनीत कौर यांनी जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताला प्रथमच सुवर्णपदक जिंकून दिले. त्यांनी महिला कम्पाऊंड सांघिक गटाच्या अंतिम सामन्यात मेक्सिकोवर २३५-२२९ असा विजय मिळवला होता.
सातारच्या लेकीची 'गरूडझेप' सुवर्ण पदकाला गवसणी घालणारी अदिती स्वामी ही सातारा जिल्ह्यातील आहे. पहिले जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत सांघिक सुवर्ण आणि नंतर वैयक्तिक सुवर्ण जिंकून तिने ऐतिहासिक कामगिरी केली. अशातच आता अदितीने तिच्या सहकारी खेळाडूंसोबत तिरंदाजी विश्वचषक स्टेज ४ कम्पाऊंडमध्ये सुवर्ण पदकाला गवसणी घातली. लक्षणीय बाब म्हणजे जागतिक तिरंदाजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत मेक्सिकोच्या अँड्रिया बेसेरा हिला १४९-१४७ ने पराभूत करून कंपाऊंड तिरंदाजीमध्ये अदितीने विश्वविजेतेपद मिळवले होते. १७ वर्षांची अदिती गोपीचंद स्वामी ही भारताची पहिली विश्वविजेती ठरली आहे.