जागतिक युनिव्हर्सिटी स्पर्धेत भारताच्या ज्योती याराजीने ( Jyothi Yarraji ) राष्ट्रीय विक्रमासह कांस्यपदक नावावर केले. महिलांच्या १०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत ज्योतीने १२.७८ सेकंदाची वेळ नोंदवून राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. पण, ०.०१ सेकंदाने तिचे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचे ( 12.77 सेकंद) तिकीट चुकले. १०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीतीत भारताची ती सर्वात वेगवान धावपटू आहे.
२८ ऑगस्ट १९९९ मध्ये विशाखापट्टणम येते जन्मलेल्या ज्योतीची लहानपणापासूनच अडथळ्यांची शर्यत सुरू होती. तिचे वडील सूर्यनाराणन हे एका खाजगी कंपनीत सुरक्षा रक्षक आहेत, तर तिची आई कुमारी या सिटी हॉस्पिटलमध्ये पार्ट टाईम सफाईचं काम करतात. या दोघांचं मिळून महिन्याचं उत्पन्न हे १८ हजाराच्या आसपास आहे. तरीही ज्योतीने हार मानली नाही. ज्योतीचे समर्पण आणि परिश्रम पाहून शारीरिक शिक्षण शिक्षिकेने तिला शालेय जीवनातच ओळखले होते. ज्योतीची उंची पाहून त्यांना वाटले की ती अडथळा शर्यतीत धावपटू बनू शकते. इथून ज्योतीचा अॅथलीट होण्याचा प्रवास सुरू झाला.
थायलंडमध्ये झालेल्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ज्योतीने सुवर्णपदक जिंकून संपूर्ण भारताचा अभिमान वाढवला आहे. वयाच्या १५व्या वर्षी आंध्र प्रदेशच्या जिल्हा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून ज्योतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. २०१६ मध्ये तिने हैदराबादमध्ये एन रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतले. कौटुंबिक परिस्थितीची पर्वा न करता ज्योतीने तिची मेहनत सुरूच ठेवली, त्याचे फळही तिला मिळाले.