नवी दिल्ली : भारताच्या अव्वल स्क्वॅशपटू दीपिका पल्लीकल व ज्योत्स्ना चिनप्पा यांच्यामध्ये इंचियोन आशियाई क्रीडा स्पर्धेत उपांत्यपूर्व लढतीदरम्यान वाद झाला होता. या दोन्ही दिग्गज खेळाडूंदरम्यानचा वाद आता मिटला असून, पुन्हा एकदा त्या एकत्र आल्या आहेत. त्या लढतीत दीपिकाने विजय मिळविला होता आणि आशियाई स्पर्धेत महिला एकेरीत प्रथमच पदक निश्चित केले होते. यानंतर मात्र या दोन दिग्गज खेळाडूंच्या मैत्रीत फूट पडली होती. इंचियोनमध्ये कोर्टवर वाद झाल्यानंतर या दोन्ही खेळाडूंनी एकमेकींशी बोलणे बंद केले होते. त्यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला प्रथमच सुवर्णपदक पटाकवून देण्याची ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर महिनाभरात हा वाद झाला होता. ज्योत्स्ना म्हणाली, ‘‘आमच्यात सर्व काही सामान्य आहे. आम्ही एकमेकींना प्रदीर्घ कालावधीपासून ओळखतो. आम्हाला एकत्र खेळण्याचे आणि भारतासाठी अधिक पदके पटकावून देण्याचे महत्त्व कळलेले आहे.’’ ज्योत्स्ना सध्या १३व्या स्थानी आहे. तिने दीपिकाला पिछाडीवर सोडले आहे. दीपिका इंचियोनचा वाद विसरली आहे. दीपिका म्हणाली, ‘‘आम्ही पदकासाठी खेळत होतो. ती लढत खडतर होती. यानंतर जे काही घडले ते घडायला नको होते. सर्व विसरून आम्ही आगेकूच करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही देशातील आघाडीच्या खेळाडू असून, आमच्यात एकी असणे आवश्यक आहे. ज्योत्स्ना आणि मी कॅनडामध्ये खेळत होतो. तिने पुढाकार घेतला. त्यानंतर आम्हाला पुन्हा एकदा चांगल्या मैत्रिणी होण्यास वेळ लागला नाही. आम्ही ज्युनिअर पातळीपासून एकत्र खेळत असून, एकत्र प्रवास करीत आहोत.’’ (वृत्तसंस्था)
ज्योत्स्ना चिनप्पा - दीपिका पल्लीकल वाद मिटला
By admin | Published: December 15, 2015 1:32 AM