नवी दिल्ली - गेल्या काही महिन्यांपासून फाॅर्मशी झगडणारा भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत खेळातील उणिवा दूर केल्यानंतर पहिल्यांदा आशियाई पदक जिंकण्यासाठी हांगझोउमध्ये मैदानावर उतरणार आहे.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानापर्यंत मजल मारणारा श्रीकांत २०२३मध्ये २१व्या स्थानावर घसरला आहे. तो २०१४ आणि २०१८ आशियाई स्पर्धेत अनुक्रमे अंतिम १६ आणि अंतिम ३२ फेरीपुढे जाऊ शकला नव्हता. गुंटूरच्या या ३० वर्षीय खेळाडूने राष्ट्रकुल आणि जागतिक अजिंक्यपद अशा प्रमुख स्पर्धांमध्ये पदक जिंकले आहे. त्यामुळे त्याचे लक्ष्य आशियाई स्पर्धेतील पदक दुष्काळ संपवण्याचे आहे.
श्रीकांतने निवड चाचणीत अव्वल स्थानावर राहिल्यानंतर आशियाई स्पर्धेसाठीच्या संघात स्थान मिळवले. त्यामुळे तो या संधीचा लाभ घेण्यात कोणतीही कसर सोडणार नाही. श्रीकांतने पीटीआयला सांगितले की, आशियाई स्पर्धेतील माझ्या आठवणी चांगल्या नाहीत. याआधी दोनवेळी मी वैयक्तिक स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरलो होतो. अशातच जर यावेळी चांगला खेळलो तर काहीतरी मिळवण्यात यशस्वी ठरेन.
आशियाई स्पर्धा आणि ऑलिम्पिक वगळता मी सर्वत्र पदके जिंकले आहे. त्यामुळे मला येथेही अशा कामगिरीचा विश्वास वाटतो. चार वर्षांतून ही स्पर्धा होते त्यामुळे मी मिळालेल्या संधीचा पूर्ण लाभ घेण्याचा प्रयत्न करणार आहे.
सर्वोत्तम कामगिरीला नाही पर्यायआशियाई स्पर्धेच्या तयारीबाबत तो म्हणाला की, ऑलिम्पिक, जागतिक अजिंक्यपद, राष्ट्रकुल, आशियाई स्पर्धांची तयारी कोणत्याही सुपर सिरीज स्पर्धेच्या तुलनेत थोडी वेगळी असते. मी वर्षात १०-१५ स्पर्धांमध्ये सहभागी होतो. पण आशियाई स्पर्धा चार वर्षांतून एकदा होत असल्यामुळे तुम्हाला संघात स्थान मिळवणे आवश्यक असते. क्रमवारीत २० च्या आत असलेला खेळाडूही संघात स्थान मिळवेलच असे नाही. आशियाई खेळाडूंचा दबदबा असल्यामुळे पदक जिंकण्यासाठी तुम्हाला सर्वोत्तम कामगिरी करावी लागते. श्रीकांत सध्या भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.