पुणे : वैद्यकीय पेशात कोणत्याही क्षेत्रातील स्पेशालिस्ट अर्थात तज्ज्ञ होण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते, अभ्यास करावा लागतो. पण कबड्डी प्रशिक्षक, व्यवस्थापक, कार्यालयीन प्रमुख व इतर पदाधिका-यांनी वैद्यकीय क्षेत्रातील कुठलाही अभ्यासक्रम पूर्ण न करता स्त्रीरोगतज्ज्ञ बनण्याचा चमत्कार करून दाखविला. या अधिका-यांना राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडलेल्या खेळाडूच्या पोटात गाठ झाल्याचे निव्वळ दिव्यदृष्टीने माहीत झाले. अगदी सोनोग्राफी न करताही त्यांनी हे निदान करण्याचा पराक्रम केला. या अफलातून वैद्यकीय ज्ञानाचा एक साईड इफेक्ट मात्र झालाय. या संशोधनामुळे पुण्यातील एका खेळाडूला स्पर्धेस मुकावे लागले.हैदराबाद येथे ३१ डिसेंबरपासून राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा होत आहे. यासाठी महाराष्ट्र संघ जाहीर झाल्यानंतर कराड (जि. सातारा) येथे त्यांचे सराव शिबिर झाले. यात पुण्याची आम्रपाली गलांडेही सहभागी होती. सरावादरम्यान २७ तारखेला तिच्या पोटात दुखायला लागले. संघासोबत असलेले व्यवस्थापक गायकवाड यांनी तिला कराडमधील श्री हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी नेले. मासिक पाळीचा पहिला दिवस असल्याने हा त्रास होत असल्याचे सांगून डॉक्टरांनी तिला एक दिवस विश्रांतीचा सल्ला दिला. तसे प्रमाणपत्रही आम्रपालीला डॉक्टर अभिजित तांबे यांनी दिले. प्रत्यक्षात मात्र तिच्या पोटात गाठ असून ती खेळण्यास तंदुरुस्त नसल्याचा निष्कर्ष काढत तिला या स्पर्धेसाठी डावलण्यात आले. विशेष म्हणजे, डॉ. तांबे यांच्या रिपोर्टमध्ये पोटात गाठ असल्याचे कुठेच नमूद नाही.यासंदर्भात सराव शिबिरासाठी महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक राजेश ढमढेरे, व्यवस्थापक अंबादास गायकवाड, महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे कार्यालयीन प्रमुख गणेश कदम, संघटनेचे सचिव आस्वाद पाटील, उपाध्यक्ष तसेच पुणे जिल्हा कबड्डी संघटनेचे सचिव बाबूराव चांदेरे या सर्वांशी संपर्क साधला; मात्र कोणीही आम्रपालीवरील अन्याय दूर करू शकले नाही. राज्यातील कबड्डी क्षेत्रात ज्यांच्या शब्दाला वजन आहे, ते राज्य संघटनेचे माजी अध्यक्ष अजित पवार यांच्याशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला. मात्र, संपर्क झाला नाही. अखेर आम्रपाली स्पर्धेसाठी जाऊ शकली नाही. राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ शुक्रवारी दुपारी ३ वाजता पुण्याहून रवाना झाला.‘लोकमत’ प्रतिनिधीने कराडच्या डॉक्टर तांबे यांना संपर्क साधला तेव्हा आम्रपालीच्या पोटात गाठ नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मासिक पाळीदरम्यान आधीही तिला त्रास व्हायचा. भविष्यात खेळताना त्रास होऊ नये म्हणून डॉ. तांबे यांनी तिला सोनोग्राफीद्वारे खात्री करून घेण्याचा सल्ला तिला दिला होता.>पोटात गाठ असल्याने आम्रपालीला वगळण्यात आले. व्यवस्थापक गायकवाड यांनी तिला कराडच्या हॉस्पिटलमध्ये नेले होते. पोटात गाठ असल्याचा रिपोर्ट तेथील डॉक्टरांनी दिला होता. तो राज्य संघटनेकडे पाठविण्यात आला.- राजेश ढमढेरे, प्रशिक्षक,सराव शिबिर, महाराष्ट्र संघ>दोन वर्षांपूर्वी पोटाचे आॅपरेशन झाल्याची माहिती आम्रपालीने डॉक्टरांना दिली. पोटाचा गंभीर त्रास असल्याने ती खेळण्यास अनफिट असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिला बेडरेस्टचा सल्लाही दिला. यासंदर्भात मी राज्य संघटनेचे कार्यालयीन प्रमुख गणेश कदम यांचे डॉ. तांबे यांच्याशी बोलणेही करून दिले.- अंबादास गायकवाड, व्यवस्थापक,सराव शिबिर, महाराष्ट्र संघ>आम्रपाली आजारी असल्याचे तिचे प्रशिक्षक आणि व्यवस्थापकांनी सांगितले. ती स्पर्धेत खेळण्यास अनफिट असल्याचा रिपोर्ट कराडच्या डॉक्टरांनी दिला होता. तिच्या पोटात गाठ असल्याचे त्यात नमूद आहे. राज्य संघटनेच्या सचिवांनी सांगितल्यानुसार आम्रपालीचे नाव गाळण्यात आले.- गणेश कदम, कार्यालयीन प्रमुख,महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना
कबड्डी संघटनेचे अधिकारी झाले स्त्रीरोगतज्ज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 12:14 AM