मुंबई : मुंबई शहर कबड्डी असो. आयोजित आणि मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ पुरस्कृत “जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी” स्पर्धेच्या पुरुष व्दितीय श्रेणी ओम पिंपळेश्वर क्रीडा मंडळ, तर पुरुष तृतीय श्रेणी गटात बालविकास क्रीडा मंडळ अजिंक्य ठरले. किशोरी गटात शिवशक्ती महिला संघ(ब) ने उपांत्य फेरीत धडक दिली, शिवशक्ती महिला संघ(अ) मात्र उपांत्यपूर्व फेरीतच गारद झाले.
नायगाव-मुंबई येथील भारतीय क्रीडा मंदिराच्या क्रीडांगणावर सुरू असलेल्या पुरुष व्दितीय श्रेणीच्या अंतिम सामन्यात ओम पिंपळेश्वरने सक्षम क्रीडा मंडळाला २८-१५ असे लीलया पराभूत करीत या गटाचा मुकुट पटकाविला. मध्यांतरापर्यंत चुरशीने खेळल्या हा सामना नंतर मात्र एकतर्फी झाला. मध्यांतराला १०-०८ अशी पिंपळेश्वरकडे आघाडी होती. चेतन गावकर, शुभम साटम, गणेश गुप्ता यांनी उत्तरारार्धात जोरदार खेळ करीत हे जेतेपद पटकाविले. सक्षमच्या प्रफुल्ल माने, प्रणय गुरव यांची उत्तरार्धात मात्रा चालली नाही. या अगोदर झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ओम पिंपळेश्वरने महागाव क्रीडा मंडळाचा ३७-२९ असा, तर सक्षमने जय दत्तगुरु कबड्डी संघाचा पराभव करीत अंतिम फेरी गाठली होती.
तृतीय श्रेणी पुरुषांच्या अंतिम सामन्यात बाल विकास क्रीडा मंडळाने श्री साई क्लबचा प्रतिकार ३२-२९असा मोडून काढत या गटाच्या विजेतेपद मुकुट आपल्या नावे केला. पहिल्या डावात १६-०५ अशी भक्कम आघाडी घेणाऱ्या बाल विकासाला दुसऱ्या डावात मात्र विजयासाठी कडवा संघर्ष करावा लागला. अखेर ३ गुणांनी सामना बाल विकासाने आपल्याकडे झुकविला. कल्पेश चव्हाण, निलेश सणस, अनिकेत पवार या विजयाचे शिल्पकार ठरले. प्रतीक पाटील, हर्षल भुवड यांना उत्तरार्धात चांगला सूर सापडला, पण त्याचे विजयात रूपांतर करणे त्यांना जमले नाही. या अगोदर झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बाल विकासाने यश क्रीडा मंडळाला ४८-२६ असे, तर श्री साईने माऊली स्पोर्ट्सला ३५-२२ पराभूत करीत अंतिम फेरीत धडक दिली होती.
किशोरी गटाच्या उपांत्यपूर्व सामन्यात शिवशक्ती महिला संघ(ब)ने महर्षी दयानंद स्पोर्ट्सला ४८-३४ असे पराभूत करीत उपांत्य फेरी गाठली. मध्यांतराला २३- १७ अशी आघाडी घेणाऱ्या शिवशक्तीकडून रिद्दी हडकर, खुशी गुप्ता, नेहा गुप्ता यांनी चतुरस्त्र खेळ करीत हा विजय साकारला. महर्षी दयानंदकडून रिया मंडकईकर, दिशा सिंग, रेश्मा यादव चमकल्या. दुसऱ्या सामन्यात मात्र शिवशक्ती(अ) संघाला पराभवाचा सामना करावा लागला. अमरहिंद मंडळाने शिवशक्ती महिला (अ) संघाला ७२-४८असे सहज नमवित उपांत्य फेरी गाठली. मध्यांतरापर्यंत चुरशीने खेळलेल्या या सामन्या ३५-२८अशी आघाडी अमरहिंद मंडळाकडे होती. उत्तरार्धात मात्र सामना एकतर्फी अमरहिंडकडे झुकला. सलोनी नाक्ती, पेल्सीका नाडार, भूमी मर्चंड यांच्या चढाई-पकडीच्या झंजावाती खेळाला या विजयाचे श्रेय जाते. किरण निकम, दीपिका फुलसुंगे, रक्षा जाधव या शिवशक्तीच्या खेळाडूंचा आज सूर लागला नाही.