दुबई : सहा देशांचा समावेश असलेल्या कबड्डी मास्टर्स २०१८ मध्ये भारताने वर्चस्व राखले. अंतिम सामन्यात इराण संघाचा ४४-२७ असा पराभव करीत भारतीय संघाने चॅम्पियनचा मान पटकाविला. कबड्डी विश्वातील दोन अव्वल संघ अंतिम फेरीत एकमेकांपुढे ठाकले होते. तीन वेळा विश्वचॅम्पियन असलेल्या भारताने सामन्याच्या सुरुवातीपासून इराणला संधी दिली नाही. कर्णधार अजय ठाकूर (९ गुण) याने सर्वाच्च कामगिरी केली. मोनू गोयत याने सहा गुण मिळवले. भारतीय संघाने इराण संघाला दोन वेळा आॅलआउट केले. त्यामुळे त्यांना मोेठ्या फरकाने विजय संपादन करता आला. सामन्याच्या पहिल्या सत्रात स्टेडियममध्ये विद्युत खंडित झाली होती. ज्यामुळे १० मिनिटांचा खेळ थांबला होता. दुसºया सत्रात इराणचा कर्णधार अमीर होस्सेइन मालेकी याने भारतीय संघावर ‘रफ प्ले’चा आरोप लावला ज्याचे पंचांनी खंडन केले. दरम्यान, दोन्ही संघ यापूर्वी २०१६ मध्ये अहमदाबाद येथे झालेल्या विश्वचषकात एकमेकांविरुद्ध खेळले होते. ज्यात अजय ठाकूर याने भारताकडून ९ गुण मिळवून देत महत्त्वाची भूमिका बजावली होती.
कबड्डीत भारत चॅम्पियन! इराणचा दारुण पराभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2018 12:59 AM