मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ पुरस्कृत आणि मुंबई शहर कबड्डी असो. च्या विद्यमाने आयोजित केलेल्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या पुरूष व्दितीय श्रेणी गटात जय भारत सेवा मंडळ,अमर संदेश स्पोर्ट्स क्लब, ओम पिंपळेश्वर क्रीडा मंडळ, श्री साई क्रीडा मंडळ यांनी उप-उपांत्य फेरी गाठली.
नायगाव-मुंबई येथील भारतीय क्रीडा मंदिराच्या पटांगणावर सुरू असलेल्या उप-उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात जय भारताने अतिशय चुरशीच्या लढतीत गणेश स्पोर्ट्सचे आव्हान ४३-३६ असे परतवून लावत आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली. विजय आंगणे, प्रफुल्ल पवार यांनी आक्रमक सुरुवात करीत श्री गणेशला २४-०९अशी विजयाच्या दृष्टीने भक्कम आघाडी मिळवून दिली होती. पण त्यांचा आततायीपणा व अति आत्मविश्वास त्यांना नडला. उत्तरार्धात जय भारताने योजनाबद्ध खेळ केला. त्यांच्या यश सावंत, चेतन परब यांनी धारदार आक्रमण करीत चढाईत भराभर गुण वसूल केले. त्याला राहुल पवारने धाडशी पकडी करीत उत्तम साथ दिली. म्हणूनच स्वप्नावत वाटणाऱ्या विजय त्यांना मिळविता आला.
अमर संदेश स्पोर्ट्सने ओम श्री साईनाथ ट्रस्टचा ३३-१५ असा धुव्वा उडविला. पहिल्या डावात १७-०८अशी आघाडी घेणाऱ्या अमर संदेशने उत्तरार्धातही तोच जोश कायम ठेवत हा विजय सोपा केला. विकास गुप्ता, पंकज सिंह, अभिषेक पाल यांच्या चतुरस्त्र खेळाला या विजयाचे श्रेय जाते. ओम श्री साईनाथच्या अक्षय सावंत, सर्वेश लाड यांची या सामन्यात मात्रा चालली नाही. ओम पिंपळेश्वरने श्री स्वामी समर्थचा प्रतिकार ३६-२७ असा संपुष्टात आणला. गणेश गुप्ता, चेतन गावकर ओम पिंपळेश्वरच्या या विजयात चमकले. श्री स्वामी समर्थाच्या वैभव भुवडने एकाकी लढत दिली. श्री साई क्रीडा मंडळाने काळेवाडीचा विघ्नहर्ता संघाला ३०-१८असे नमवित उप-उपांत्य फेरीत धडक दिली. स्वप्नील पवार, जितेश सांगडे यांच्या पल्लेदार चढाया, आणि पराग नांगली याच्या नेत्रदीपक पकडीचा खेळ या विजयात महत्वपूर्ण ठरला. काळेवाडीचा राज बेलोसे, कुणाल आवटे यांचा खेळ संघाला विजयी करण्यास कमी पडला.
संक्षिप्त निकाल :- १)शिवनेरी स्पोर्ट्स क्लब विजयी विरुद्ध गावदेवी सेवा मंडळ (२६-२०); २)श्री गणेश स्पोर्ट्स क्लब वि वि बारादेवी स्पोर्ट्स क्लब (३४-२१); ३)अग्निशमनदल मित्र मंडळ वि वि ओम श्री साईनाथ स्पोर्ट्स (२८-२९); ४)श्री स्वामी समर्थ क्रीडा मंडळ वि वि छत्रपती शिवाजी व्यायाम शाळा (२७-२६); ५)अमर संदेश स्पोर्ट्स क्लब वि वि बालविकास क्रीडा मंडळ (४२-२३); ६)प्रेरणा मंडळ वि वि आदर्श क्रीडा मंडळ (३६-३५); ७)काळेवाडीचा विग्नाहर्ता वि वि विहंग क्रीडा मंडळ (४१-३५);