मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ पुरस्कृत आणि मुंबई शहर कबड्डी असो. आयोजित पुरुष तृतीय श्रेणी गटात अभिनव स्पोर्ट्स, सूर्यकांत व्यायाम शाळा, लालबाग स्पोर्ट्स, नवनाथ मंडळ, खडा हनुमान मंडळ यांनी चौथ्या फेरीत धडक दिली. वडाळा येथील भारतीय क्रीडा मंदिराच्या पटांगणावर झालेल्या तृतीय श्रेणी पुरुष गटाच्या तिसऱ्या फेरीच्या सामन्यात अभिनव स्पोर्ट्सने बाबरशेख क्रीडा मंडळाचा चुरशीच्या लढतीत २६-२४ असा पाडाव करीत आगेकूच केली. पूर्वार्धात १६-१२ अशी आघाडी घेणाऱ्या अभिनवने उत्तरार्धात सावध खेळ करीत आपला विजय निश्चित केला. गौरव रेवाळे, महेश पांचाळ यांच्या सावध चढाया आणि सोहम लेपकर यांच्या भक्कम बचावाच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते. सचिन गझने, सचिन राऊत यांनी बाबरशेखकडून कडवा प्रतिकार केला, पण विजय काय त्यांच्या आवाक्यात आला नाही.
सूर्यकांत व्यायाम शाळेने ज्ञानेश्वर मंडळाचा ३८-२७ असा सहज पराभव केला. मंदार ठोंबरे, शुभम पवार यांच्या आक्रमक चढाया आणि प्रतीक मांडवकर, तेजस मालप यांच्या धाडशी पकडी यांच्या बळावर सूर्यकांत मंडळाने हा विजय साकारला. ज्ञानेश्वर मंडळाच्या गौरव कोळी, मंदार हडकर, वंश तरे याना या सामन्यात म्हणावा तसा सूर सापडला नाही. लालबाग स्पोर्ट्सने मध्यांतरातील ११-१२अशा निसटत्या पिछाडीवरून मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाचा प्रतिकार ३१-२५ असा संपुष्टात आणला. विशाल पाठक, आशिष ठाकूर यांच्या चढाई-पकडीच्या उत्कृष्ट खेळाला या विजयाचे श्रेय जाते.प्रतीक गुरव, वैभव कदम या मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाच्या खेळाडूंचा खेळ उत्तरार्धात बहरला नाही. नवनाथ क्रीडा मंडळाने रणझुंजार क्रीडा मंडळाचे कडवे आव्हान ३६-३४असे संपविले. आकाश पवार, प्रितेश घाग यांनी झंजावाती सुरुवात करीत रणझुंजारला विश्रांती पर्यंत १९-१२अशी बऱ्यापैकी आघाडी मिळवून दिली होती. पण ती त्यांना राखता आली नाही. नवनाथच्या शुभम घाटगे, निलेश रामाणे यांनी आपला गियर बदलत धारदार आक्रमण करीत भराभर गुण वसूल केले. त्यांना ओंकार कदमने उत्कृष्ट पकडी करीत छान साथ दिल्यामुळे हा विजय शक्य झाला. खडा हनुमान सेवा मंडळाने कृष्णामाई क्रीडा मंडळाला २६-२०असे नमवित आपली विजयी घोडदौड कायम राखली. मेहुल पाटील, तन्मय शेवाळे खडा हनुमानकडून, तर वेदांत बेंडाळे, नरेश बहादूर कृष्णामाई संघाकडून छान खेळले.