महाराष्ट्रात लोकप्रिय असलेला कबड्डी खेळ ऑलिम्पिकमध्ये खेळला जाण्याची शक्यता आहे. याबद्दल माजी खेळाडू आणि पोलंडच्या कबड्डी महासंघाचे अध्यक्ष मिचल स्पिक्झको यांनी सूचक विधान केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलंडच्या कबड्डी संघाचे अध्यक्ष मिचल स्पिक्झको यांची भेट घेतली. मोदींनी पोलंडमध्ये कबड्डी लोकप्रिय करण्यासाठी तसेच भारतीय आणि तेथील खेळाडूंमध्ये अधिक स्पर्धा आयोजित करण्याबाबत चर्चा केली. नरेंद्र मोदींसोबतच्या भेटीनंतर स्पिक्झको यांनी विविध बांबीवर प्रकाश टाकला. त्यांच्याकडून खूप सकारात्मक ऊर्जा मिळाली आणि अहमदाबादमध्ये स्टेडियम बांधल्याबद्दल त्यांचे कौतुक केले, जिथे मी २०१६ मध्ये विश्वचषकादरम्यान खेळलो होतो. २०३६ ऑलिम्पिक भारतात होईल याला आमचे समर्थन आहे. कबड्डी लवकरच ऑलिम्पिकसारख्या मोठ्या व्यासपीठावर दिसेल, अशी आशा बाळगूया, असे स्पिक्झको यांनी सांगितले.
ANI ने मिचल स्पिक्झको यांच्या हवाल्याने सांगितले की, मी पंतप्रधान मोंदीकडून खूप काही शिकलो आहे. अहमदाबाद येथे स्टेडियम बनवण्याची त्यांनी जबाबदारी स्वीकारली होती. कारण ते गुजरातचे आहेत. मी २०१६ च्या विश्वचषकात तिथे खेळलो आहे. मला वाटते की, नरेंद्र मोदींसारखी व्यक्ती पंतप्रधानपदावर असेल तर भारताला प्रत्येक खेळात प्रगती करण्याची संधी आहे. २०३६ च्या ऑलिम्पिकचे यजमानपद भारताला मिळेल यासाठी प्रयत्न करायला हवेत. तसेच कबड्डी हा खेळ देखील ऑलिम्पिकमध्ये सामील केला जाईल, असे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, भारत आणि पोलंड यांच्यात चांगले संबंध राहिले आहेत. पोलंडचे खेळाडू भारतात खेळल्या जाणाऱ्या प्रो कबड्डी लीगमध्ये सहभागी होत असतात. स्पिक्झको स्वत: पीकेएलमध्ये खेळणारे पहिले पोलंडचे खेळाडू आहेत. २०१५ मध्ये त्यांना बेंगलुरु बुल्सच्या फ्रँचायझीने खरेदी केले होते.