ऑनलाइन लोकमत
बादल, दि. २१ - विश्वचषकात भारताकडून पराभव झालेल्या पाकिस्तान संघाने कबड्डी खेळण्यासाठी पुन्हा भारतात येणार नाही असे म्हटले आहे. आयोजकांनी पक्षपातीपणा केल्यामुळेच आमचा पराभव झाला असे पाकच्या कबड्डी संघाचे म्हणणे आहे.
पंजाबमधील बादल येथे नुकताच कबड्डी विश्वचषक पार पडला असून या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामध्ये भारताने पाकचा पराभव करत विश्वचषकावर नाव कोरले आहे. मात्र आता भारताच्या विजयापेक्षा पाकिस्तानी खेळाडूंच्या रडगाण्यांमुळेच हा विश्वचषक चर्चेचा विषय ठरला आहे. सामन्याच्या शेवटच्या काही क्षणांपर्यंत पाक संघ ४ गुणांनी पुढे होता. मात्र यानंतर शेवटच्या काही मिनीटांमध्ये भारतीय कबड्डीपटूंनी चमकदार कामगिरी करत पाकवर ४५ - ४२ अशा फरकाने विजय मिळवला. यापराभवानंतर पाकचे कबड्डीपटू मैदानातच रडू लागले. आयोजकांनी पक्षपातीपणा करत नियोजीत वेळेच्या तीन मिनीटांपूर्वीच सामना संपवला असा आरोप पाक संघाचा कर्णधार शफीक चिश्तीने केला आहे. भारतीय खेळाडूंनी अंगाला तेल लावले होते व यामुळे त्यांना पकडता येत नव्हते, तर दुसरीकडे आम्हाला पाणी प्यायचीही संधी दिली जात नव्हती असे चिश्तीने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. पाक संघाचे प्रशिक्षक मलिक सफदर यांनीही चिश्तीच्या सुरात सूर मिसळले आहेत. भारताने खेळ भावनेला धक्का दिला असून आम्ही पुन्हा विश्वचषकासाठी येणार नाही असे सफदर यांनी सांगितले. या स्पर्धेचे आयोजन पंजाब सरकारकडे होते. याविषयी पंजाबचे उपमुख्यमंत्री आणि आयोजन समितीचे सदस्य सुखबीर बादल यांनी पाक खेळाडूंचा आरोप फेटाळून लावला असला तरी आम्ही त्यांच्या आरोपांची चौकशी करु असे बादल यांनी सांगितले.