मुंबई : सिद्धीप्रभा, जय दत्तगुरु, अमरहिंद, दुर्गामाता यांनी श्री सिद्धेश्वर सेवा मंडळ आयोजित "मनसे चषक" कुमार गट कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली.
मुंबई शहर कबड्डी असो.च्या मान्यतेने प्रभादेवी येथील राजाभाऊ साळवी उद्यानातील मैदानावर आज पासून सुरू झालेल्या उदघाटनिय सामन्यात प्रभादेवीच्या सिद्धीप्रभाने अशोक मंडळाने भवानीमाताचा ४४-२४असा पाडाव करीत विजयी सलामी दिली. पहिल्या पाच मिनिटात लोण देत सिद्धीप्रभाने १०-०१अशी आघाडी घेत आम्हीच विजयी होणार हेच जणू सिद्ध केले. विश्रांतीला २६-१५अशी त्यांच्याकडे आघाडी होती. ओमकार ढवळ, विवेक मोरे यांच्या शानदार चढाई-पकडीच्या खेळामुळे सिद्धीप्रभाने हा सामना सहज आपल्या खिशात टाकला. अशोक मंडळाच्या ओमकार चव्हाण, शुभम बावणे यांनी १५व्या मिनिटाला लोणची परतफेड करीत सामन्यात रंगत आणली. पण नंतर मात्र सामना एकतर्फी झाला.
दुसऱ्या सामन्यात जय दत्तगुरुने भवानीमाताला ३६-२३असे नमवित आगेकूच केली.अत्यंत चुरशीनें खेळल्या गेलेल्या या सामन्यात दत्तगुरुने सुरुवातच अशी आक्रमक केली की, भवानीमातावर पहिला लोण देत ९-०अशी आघाडी घेतली.पण त्यांचा हा आनंद क्षणभंगुर ठरला. कारण त्या लोणची परतफेड करीत भवानीमाताने १३-१४अशी आघाडी कमी केली. विश्रांतीला दोन्ही संघ १५-१५असे बरोबरीत होते. ही कोंडी दत्तगुरूंच्या मोनुने फोडली.त्यांने चढाईत सलग दोन गुण घेत संघाला आघाडी मिळवून दिली. मोनू कांदू, आकाश उपाध्याय दत्तगुरु कडून, तर अनिकेत मंडव, सिद्धेश परब, यश कवठकर भवानीमाताकडून उत्तम खेळले. अ
मरहिंदने ओम साईनाथ ट्रस्टचा ४०-१८असा पराभव केला. तिसऱ्या मिनिटाला लोण देत अमरहिंदने ९-०अशी आघाडी घेतली.पण साईनाथच्या सिद्धेश राऊतने आपल्या पुढच्याच चढाईत ७गडी टिपत लोणची परतफेड करीत ९-९अशी बरोबरी केली. कुमार खेळाडूने एका चढाईत ७गडी टिपण्याचा पराक्रम बहुदा हा पहिल्यांदाच घडला असावा. विजय नवनाथच्या सागर कुऱ्हाडेने प्रौढ गटात असा विक्रम केला होता. ओमकार पाटील, नंदिश बर्डे यांच्या चढाई-पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते. शेवटच्या सामन्यात दुर्गामाताने न्यू राष्ट्रीयचा ३१-०५असा धुव्वा उडविला. त्यांच्या या विक्रमी विजयाचे श्रेय प्रथमेश पालांडे,करणं कदम, अमित बिस्त यांच्या जोरकस खेळाला जाते.न्यू राष्ट्रीयचा विक्रात खापणे बरा खेळला.