पुणे : स्लेजिंग हे आॅस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या रणनीतिचे अविभाज्य अंग. एरवी गुणवत्तेच्या बाबतीत हा संघ उच्च दर्जाचा असला, तरी प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करण्यासाठी स्लेजिंगचा वापरदेखील त्यांच्याकडून कायम करण्यात येतो. या वेळी भारत दौऱ्यातही त्याचा उपयोग करणार असल्याची अप्रत्यक्ष कबुली पाहुण्या संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने दिली आहे. गुणवत्तेप्रमाणे स्लेजिंगमध्येही कांगारू कधीच मागे नव्हते. असे असले तरी, ‘‘प्रत्येक खेळाडूसाठी आम्ही योजना आखली आहे. स्लेजिंग असो वा मैदानावरील खेळ, आम्ही प्रतिस्पर्ध्यांना पुरून उरू,’’ असा विश्वास भारताचा मध्यफळीतील फलंदाज अजिंक्य रहाणे याने सोमवारी पुण्यात व्यक्त केला.उभय संघांतील ४ कसोटींच्या मालिकेतील पहिल्या कसोटीचा थरार येत्या २३ तारखेपासून गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर रंगणार आहे. या लढतीसाठी रविवारी पुण्यात दाखल झालेल्या भारतीय संघाने जोरदार सराव सुरू केला आहे. सोमवारी सरावात भारतीय खेळाडूंनी घाम गाळल्यानंतर अजिंक्यने पत्रकारांशी संवाद साधला. तो म्हणाला, ‘‘कांगारूंना प्रत्येक क्षेत्रात तोडीस तोड उत्तर देण्यासाठी आम्ही योजना आखल्या आहेत. त्या काय आहेत, हे आताच सांगणे योग्य होणार नाही. फिरकी गोलंदाजीच नव्हे, तर आॅस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्याचाही सकारात्मकपणे सामना करण्यास आम्ही सज्ज आहोत. संपूर्ण मालिकेत आक्रमक खेळ करण्यावर आमचा भर असेल.’’ या मालिकेत फिरकीपटूंना पोषक खेळपट्टी बनविण्यात येईल, अशी अपेक्षा पाहुण्या संघाची आहे. यादृष्टीने ३ वेगवान आणि ५ फिरकी गोलंदाज खेळविण्याचे त्यांचे नियोजन असेल. याबाबत विचारले असता, या गोष्टींचा फारसा विचार न करता आम्ही आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवून परिस्थितीनुरूप खेळ करणार असल्याचे अजिंक्यने स्पष्ट केले. ही खेळपट्टी नेमकी कशी आहे, हे पहिल्या दिवसाच्या खेळानंतरच कळेल, असेही अजिंक्यने एका प्रश्नाच्या उत्तरात नमूद केले. (क्रीडा प्रतिनिधी)आम्ही स्लेजिंगची पर्वा करीत नाही. मार्इंड गेम खेळण्यात कांगारू माहीर आहेत. त्यांना जे करायचे, ते त्यांनी करावे. खेळातील कौशल्य असो वा स्लेजिंग, प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजविणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यासाठी आम्ही योग्य त्या योजना आखल्या आहेत.- अजिंक्य रहाणे
‘कांगारूंना पुरून उरणार’
By admin | Published: February 21, 2017 12:46 AM