चेन्नई : भारतीय यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक आपल्या नव्या जीवनाची सुरुवात करीत आहे. अव्वल स्क्वॅशपटू दीपिका पल्लीकलसोबत कार्तिक ख्रिश्चन पद्धतीने गुरूवारी विवाहबद्ध झाले आहेत. या दोघांचा तेलुगू नायडू पद्धतीने २० आॅगस्ट रोजी विवाह होणार आहे. पहिल्या पत्नीपासून घटस्फोट झाल्यानंतर कार्तिकने दोन वर्षांपूर्वी दीपिकासोबत वाङनिश्चय केला होता. दीपिका ही ईसाई आहे, तर कार्तिक हिंदूधर्मीय आहे. त्यामुळे या दोघांनी दोन्ही पद्धतीने विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे. दीपिकाने या सोहळ्यासाठी खास तयारी केली आहे. तिने लग्नाच्या खरेदीचा मनमुराद आनंद लुटला असून, पोषाख आणि दागिन्यांच्या खरेदीसाठी ती अमेरिकेलाही जाऊन आली आहे. या विवाहसोहळ्यास जवळच्या नातेवाइकांशिवाय वन-डे संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना आणि रवींद्र जडेजा हे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. बहुतेक खेळाडू कसोटी दौऱ्यात व्यस्त असल्याने लग्नास उपस्थित राहणार नाहीत. दीपिकाचा रंग गुलाबी असल्याने विवाह समारंभाची थीम गुलाबी असणार आहे. (वृत्तसंस्था)
कार्तिक, दीपिका लग्नाच्या बेडीत
By admin | Published: August 18, 2015 10:38 PM