नवी दिल्ली : भारत ‘अ’ आणि अंडर-१९ संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने कसोटी कर्णधार विराट कोहली व मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांची प्रशंसा केली. युवा खेळाडूंना सहज वाटेल, असा माहोल त्यांनी संघात तयार केला, असे द्रविड म्हणाला. द्रविडच्या मते भारत ‘अ’ संघातील करुण नायर व जयंत यादव यांच्यासाठी ‘प्रक्रिया’ तयार करण्यात आल्यामुळे ते यशस्वी ठरले.द्रविड म्हणाला, ‘स्थानिक स्पर्धा आणि ‘अ’ संघातर्फे चमकदार कामगिरी केल्यानंतर हे खेळाडू राष्ट्रीय संघात दाखल झाले. राष्ट्रीय संघातील माहोलमुळे हे खेळाडू यशस्वी ठरले. तेथे त्यांच्यावर कुठलेही दडपण नसून त्यांना सहज वाटत आहे. त्यामुळे त्यांना चमकदार कामगिरी करता आली. राष्ट्रीय संघातील माहोल सहज करण्याचे श्रेय सर्वस्वी विराट कोहली व अनिल कुंबळे यांना द्यायला हवे. त्यामुळे आपल्याला अनुकूल निकाल मिळत असून या प्रक्रियेचा एक भाग होणे शानदार आहे.’द्रविडने करुण नायरला ‘अ’ संघ, दिल्ली डेअरडेव्हिल्स व राजस्थान रॉयल्स संघातर्फे खेळताना बघितले आहे. त्याच्या यशाचा द्रविडला अभिमान आहे. द्रविड म्हणाला, ‘त्याला पहिले शतक झळकावताना बघणे आणि त्याचे रुपांतर त्रिशतकात करताना बघणे शानदार होते. त्यामुळे त्याच्या क्षमतेची प्रचिती येते’द्रविडने सांगितले की, ‘माझे काम ‘अ’ आणि अंडर-१९ संघांसाठी सामने जिंकणे आणि राष्ट्रीय संघासाठी चांगले खेळाडू तयार करण्याचे आहे. माझ्या मते अंडर-१९ व ‘अ’ संघ हे निकालासाठी नाहीत. अनुकूल निकाल मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतो, पण युवा खेळाडूंचा विकास व त्यांना संधी मिळणे अधिक महत्त्वाचे आहे. प्रशिक्षकाचे काम केवळ त्यांना खेळाडू म्हणून घडविणेच नसून चांगली कारकीर्द घडविण्यासाठी मार्गदर्शन करण्याचे असते.’ (वृत्तसंस्था)
करुण, राहुल व जयंत यांच्यासारख्या खेळाडूंना या युगात बघताना आनंद होतो. हार्दिक पंड्याला ‘अ’ संघाच्या दौऱ्यात संधी मिळाली होती, पण दुखापतग्रस्त असल्यामुळे त्याला खेळता आले नव्हते. - राहूल द्रविड