सिडनी : आॅस्टे्रलिया ओपन सुपर सीरिज स्पर्धेसाठी सज्ज झालेला भारताचा अनुभवी शटलर पारुपल्ली कश्यप याने पात्रता फेरीत आपला धडाका राखताना सलग दोन सामने जिंकून मुख्य स्पर्धेत जागा मिळवली. मुख्य स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात कश्यपपुढे कडवे आव्हान असून त्याला जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या कोरियाच्या सोन वॉन हो विरुद्ध दोन हात करावे लागणार आहे. दुखापतींमुळे मोठ्या कालावधीपर्यंत खेळापासून दूर राहिल्यानंतर पुनरागमन करत असलेल्या कश्यपने पात्रता स्पर्धेच्या पहिल्या फेरीत चीनच्या झाओ जुनपेंगचा २१-१५, २१-१८ असा धुव्वा उडवला. यानंतर दुसऱ्या फेरीत कश्यपने दिमाखदार विजय मिळवताना नुकताच झालेल्या इंडोनेशिया ओपन सुपर सीरिज स्पर्धेचा उपविजेता जपानच्या काजुमासा साकाईला नमवले. दुसरीकडे, मुख्य स्पर्धेत भारताच्या विजेतेपदाच्या आशा असलेल्या किदाम्बी श्रीकांत पहिल्या दौऱ्यात चीनी तैपईच्या कान चाओ यू विरुद्ध लढेल. कान जाओ यू याने पात्रता फेरीत आॅस्टे्रलियाच्या जेकब शुएलरला २१-१५, २१-१८ असे नमवले. यानंतर त्याने चीनी तैपईच्याच चुन वेई चेन याला २१-१५, २३-२१ असे नमवून मुख्य फेरीत प्रवेश केला. ऋत्विका मुख्य फेरीतमहिला एकेरीमध्ये ऋत्विका शिवानी गाडे हिने आॅस्टे्रलियाच्या सिलविना कुनयिवानला २१-१५, २१-१५ असे नमवल्यानंतर स्थानिक खेळाडू रुविंडा सेरासिंघेला २१-९, २१-७ असे लोळवून मुख्य फेरीत जागा मिळवली. चीनच्या चेन शियाओशिनविरुध्द शिवानी मुख्य फेरीत सलामीची लढत खेळेल.
कश्यपची मुख्य फेरीत धडक
By admin | Published: June 21, 2017 12:56 AM